उबाठाच्या जि. प. गटनेतेपदी विक्रांत जाधव यांची वर्णी

शिवसेना ठाकरे पक्षाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती गट नेते पदांच्या निवडी जाहीर

रत्नागिरी:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपल्या संघटनात्मक निवडी जाहीर केल्या असून यामध्ये चिपळूण आणि खेड तालुक्यांतील अनुभवी कार्यकर्त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाच्या जिल्हा परिषद गट नेते पदी विक्रांत जाधव यांची वर्णी लागली आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्हा परिषदेत पक्षाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी एक आक्रमक चेहरा मिळाल्याचे मानले जात आहे. बुधवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवडीचे पत्र सुपूर्द करण्यात आले.
पंचायत समिती स्तरावरही पक्षाने नवीन नियुक्त्या केल्या आहेत. चिपळूण पंचायत समितीच्या गट नेते पदी गौरव पाटेकर यांची निवड करण्यात आली असून, खेड पंचायत समितीच्या गट नेते पदाची जबाबदारी अजय चाळके यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी लक्षात घेऊन या नियुक्त्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. या निवडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.