चिपळुणात आज मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा

चिपळूण:- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची बुधवारी २८ रोजी दुपारी १ वाजता शहरातील बहादूरशेखनाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या निमीत्ताने विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती भाजप नेते प्रशांत यादव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यादव यांच्या नेतृत्वाखाली या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीसाठी चिपळूण तालुक्यात शिवसेना भाजप युती झाली आहे. जिल्हा परिषदेसाठी भाजपचे ३ आणि शिवसेनेचे ६ तसेच पंचायत समितीसाठी भाजपचे ७ आणि शिवसेनेचे ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. चिपळूण पंचायत समितीवर शिवसेना-भाजप युतीचा भगवा फडकवण्याचा युतीच्या नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निर्धार केला आहे. तर जिल्हा परिषदेवर जास्तीत जास्त उमेदवार निवडून पाठवण्यासाठी कंबर कसली जात आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण चिपळूणात येत असल्याने त्यांच्या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची जिल्ह्यातील ही एकमेव जाहीर सभा आहे.
या सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपनेते प्रशांत यादव म्हणाले, शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची अत्यंत महत्त्वाची सभा होत आहे. या सभेने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच युतीच्या उमेदवारांमध्ये उत्साह संचारला आहे. या सभेमुळे भाजपा-शिवसेनेला यश नक्कीच मिळेल. सभेची जय्यत तयारी झाली असून भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महायुतीच्या उमेदवारांच्या माध्यमातून या सभेला १० हजार लोक उपस्थित राहतील, या दृष्टीने मंडपाची उभारणी देखील करण्यात आली आहे. भाजपात पक्षप्रवेश करण्यास अनेक जण इच्छुक आहेत, असे देखील यादव यांनी यावेळी सांगितले. या सभेमुळे युतीच्या उमेदवारांना बळ मिळेल, असा विश्वास प्रशांत यादव यांनी व्यक्त केला.