रत्नागिरी:- शासनाच्या आदेशानुसार समुद्र किनारी भागात १ जूनपासून मासेमारी बंदी लागु करण्यात आली आहे; मात्र बंदीचे उल्लंघन करुन अनेक मच्छीमारी अजुनही अनधिकृतपणे मासेमारी करत आहेत. गुरुवारी (ता. २) दुपारी आरे-वारे, गणपतीपुळेपासुन पुढे किनार्याजवळ येऊन मासेमारी केली जात होती. यावर कडक कारवाईची मागणी मच्छीमारांकडून केली जात आहे.
पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे अनेक मासे किनार्यालगत येतात. ही मासळी पकडण्यासाठी मच्छिमार समुद्रात धाव घेतात. परिणामी मत्स्य दुष्काळाची परिस्थिती गेल्या काही वर्षात ओढवू लागली आहे. यावर मात करण्यासाठी कायद्यानुसार १ जुनपासून महाराष्ट्रात मासेमारी बंदी लागू केली आहे. ३१ जुलै पर्यंत हा बंदी कालावधी आहे. यंदा मॉन्सून लवकर दाखल होईल अशी हवामान विभागाचा अंदाज आहे. परंतु समुद्र शांत असून पाण्याला तेवढा करंट नाही. हवामानही कोरडे असल्यामुळे मच्छीमारांना पोषक वातावरण आहे. त्यामुळे गुरुवारी काही मच्छीमारांनी बंदी कायद्याचे उल्लंघन करत लाटांवर स्वार होणे पसंत केले आहे. आरे-वारेपासून काही अंतरावर समुद्रात दहाहून अधिक नौका मासेमारी करताना आढळल्या. काही नौका तर आरे-वारे किनार्यालगत येऊन जाळी मारत होते. त्यांच्याकडे प्रशासनाचेही पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे. शासनाने बंदी लागू केल्यानंतर मच्छीमारांनी आपणहून नौका किनार्यावर ओढून ठेवणे आवश्यक आहे. त्याची अमंलबजावणी झालेली नसल्याचे दिसत आहे.
पाऊस सुरु होण्यापुर्वी काही काळ आधी किनारी भागात कोळंबी मिळते. याच कोळंबीसाठी बंदीचे उल्लंघन करुन फिशिंगच्या नौकांनी उड्या घेतल्या आहेत. कोरड्या वातावरणामुळे त्यांना मोकळं रान मिळाले असून मत्स्य विभागाचेही दुर्लक्ष झाले आहे. सध्या कोळंबीला किलोला ३०० ते ३५० रुपये दर मिळत आहे. हंगामाच्या अखेरीस कोळंबीवर ताव मारुन नफा कमविण्यासाठी मच्छीमार सरसावले आहेत. जुन महिन्यापासून मत्स्य विभागाच्या गस्ती नौकाही पाण्यात जात नाहीत. त्याचा फायदा अनधिकृत मासेमारी करणार्यांकडून उठवला जात असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान गुरुवारी दुपारपासून किनारपट्टी भागात वारे वाहू लागले होते. केरळपर्यंत मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाकडून सांगितले जात आहे. कोकणात पुढील चार दिवसात पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता आहे.