गणपतीपुळे रत्नागिरी मार्गावर सुमोच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

रत्नागिरी:- गणपतीपुळेहून रत्नागिरीच्या दिशेने निघालेल्या तरूणाच्या दुचाकीला बसणी-नागझरी येथील वळणावर टाटा सुमोची जोरदार धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या अपघातानंतर सुमो चालक घटनास्थळावरून पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी त्याला पाठलाग करून पकडले. दरम्यान या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली तरूणी किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पाली येथील राहणारा सौरभ मधूकर काजरेकर (वय २५, रा. डोंगरेवाडी-पाली, रत्नागिरी) हा गुरूवारी दुपारच्या सुमारास आपल्या मैत्रिणीला सोबत घेऊन गणपतीपुळेला गेला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. गणपतीपुळे येथून परतत असताना त्यांच्या दुचाकीला बसणी येथे अपघात झाला.
रत्नागिरीकडे येत होता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभ हा शुक्रवारी दुपारी गणपतीपुळेकडून दुचाकी घेऊन रत्नागिरीच्या दिशेने येत होता. त्याच्या दुचाकीच्यामागे त्याची मैत्रिण वृषाली जगदीश धाडवे (वय २१, रा. उमरे-चांदेराई) ही बसली होती. भरधाव वेगात असलेल्या टाटा सुमोची सौरभच्या दुचाकीला धडक बसली.
दोघेही रस्त्यात कोसळले देवगडवरून काही तरूण टाटा सुमो घेऊन गणपतीपुळेला निघाले होते. बसणी-नागझरी येथील वळणावर भरधाव सुमोने रत्नागिरीच्या दिशेने येत असलेल्या सौरभच्या दुचाकीला जोरदार ठोकर दिली. यामध्ये सौरभ व वृषाली ही दोघेही रस्त्यात कोसळले.

दुचाकीवरून प्रवास करणार्‍या सौरभच्या डोक्यात हेल्मेट होते. मात्र ही धडक इतकी मोठी होती की सौरभच्या डोक्यातील हेल्मेट २५ फूट लांब चेंडूसारखे उडाले व त्याची दुचाकी रस्त्यावरून फरफटत रस्त्याच्या कडेला उडाली.

या अपघाताचा आवाज झाल्यानंतर दुचाकीच्या मागे बसलेल्या तरूणीने आरडाओरड करायला सुरूवात केली. जखमी झालेली वृषाली मदतीसाठी धावा करत होती. हा आवाज ऐक़ून तेथील स्थानिक ग्रामस्थांनी अपघाताच्या दिशेने धाव घेतली.

बसणी-नागझरी येथे झालेल्या अपघातानंतर सौरभ व वृषाली हे दोघेही रस्त्यात कोसळले. सौरभ याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो रस्त्यात पडला होता. रस्त्यावर अक्षरशः रक्ताचे पाट वाहत होते तर वृषाली ही किरकोळ जखमी झाली होती.

या अपघातात सौरभ हा गंभीर जखमी झाला होता. त्याला स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात हलविले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला आहे.

या अपघातानंतर सुमो चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. गणपतीपुळे येथून सुमो सुसाट वेगाने निघाली होती. स्थानिक ग्रामस्थांनी पाठलाग करून देवगड येथील सुमो अडवली. या गाडीमध्ये ५ ते ६ तरूण होते. ते गणपतीपुळे येथे जाण्यासाठी निघाले होते.

या अपघात प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी सुमो चालक केतन नवलकोंदे (वय २०, रा. देवगड) या तरूणाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरूद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.