रत्नागिरी:- मनसेचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांना झालेल्या मारहाण प्रकरणी रत्नागिरीतील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूर्यकांत उर्फ रुपेश चव्हाण ( रा. करवांचीवाडी) आणि राहुल खेडेकर ( रा. रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत रुपेश जाधव यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मंगळवार ३ ऑगस्ट रोजी फिर्यादी रुपेश जाधव हे गोडबोले स्टॉप येथील आपले इलेक्ट्रिक चे दुकान बंद करून ऑफिस समोर लावलेल्या चारचाकी गाडीचा दरवाजा उघडत असताना त्यांच्यावर पाठीमागून हल्ला करण्यात आला. आरोपी सूर्यकांत उर्फ रुपेश चव्हाण आणि राहुल खेडेकर या दोघांनी रुपेश जाधव यांच्यावर हल्ला चढवला. राहुल खेडेकर याने रुपेश जाधव यांना धरून ठेवले तर सूर्यकांत चव्हाण याने रुपेश जाधव यांच्यावर बांबू सारख्या लोखंडी दांडक्याने हल्ला केला. रुपेश जाधव यांच्या पायावर दांडक्याने चार – पाच फटके मारल्याने ते रस्त्यावर कोसळले. यानंतर चव्हाण याने जाधव यांच्या डोक्यात, हातावर, पाठीवर, पोटावर मारहाण केली. तर दुसरा आरोपी राहुल खेडेकर याने लाथांनी जाधव यांना मारहाण केली. रुपेश जाधव यांना मारहाण करतानाचे शूटिंग करण्यात आले असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.