रत्नागिरी:- गणेशोत्सव तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जि. प. चा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. ४ पासून १७ तारखेपर्यंत २२ ठिकाणी आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत.
कोकणात दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी आपल्या गावाला दाखल होतात. सध्या पाऊस सुरू झाला आहे. तर काहीवेळा ऊन पावसाचा खेळ असल्याने वातावरणात बदल झाला आहे. याचा फटका आरोग्यावर होत असून सध्या जिल्ह्यात सर्दी, ताप, डेंग्यू, मलेरिया याची साथ आली आहे.
साथीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या चाकरमान्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला असून विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या चाकरमान्यांची आरोग्य तपासणी केली जाणार असून त्यांच्यावर त्वरित प्राथमिक उपचार केले जाणार आहेत. यासाठी २२ ठिकाणी आरोग्य पथकं तैनात करण्यात आली आहेत. ही पथके ४ सप्टेंबरपासून १७ सप्टेंबरपर्यंत असणार आहेत. परतीच्या प्रवासातही चाकरमान्यांची तपासणी केली जाणार आहे.
खेडमध्ये पाच ठिकाणी ही पथकं असणार आहेत. हॉटेल अनुसया, हॅप्पी धाबा, भोस्ते घाट, भरणे नाका, खेड रेल्वे स्टेशन, चिपळूण सवतसडा पेढे, कळंबस्त फाटा, बहाद्दरशेख नाका, अलीरे घाटमाथा, सावर्डे, चिपळूण रेल्वे स्टेशन, संगमेश्वर: आरवली, संगमेश्वर एसटी स्टॅण्ड, वांद्री, मुर्शी, संगमेश्वर रेल्वे स्टेशन, रत्नागिरी: हातखंबा तिठा, पाली, रत्नागिरी रेल्वे स्टेशन, लांजा वेरळ, कुवे गणपती मंदिर, राजापूर: जकातनाका असे एकूण २२ ठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत.
कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. जर कोण आजारी असेल, तर त्याच्यावर प्राथमिक उपचार केले जाणार आहेत. यासाठी २२ ठिकाणी पथके नेमण्यात आली आहेत. – डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जि.प. आरोग्य अधिकारी