रत्नागिरी:- मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामार्फत गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यात ३०१ कोटी निधी वितरीत करण्यात आला. त्यापैकी ४ कोटी ३७ लाख रत्नागिरी जिल्ह्यात वितरीत झाला. यातील १ कोटी ३९ लाख एवढा निधी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी विधानसभा मतदरासंघातील २१८ लाभार्थ्यांना मंजूर करून दिला आहे. या योजनेची व्याप्ती वाढुन अडचणीत असलेल्या प्रत्येक नागरिकाला ही मदत मिळावी, यासाठी आरोग्य वारी आपल्या दारी हा उपक्रम १ ऑगस्टपासून सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामहरी राऊत यांनी दिली. मंत्री उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, महिला जिल्हा प्रमुख शिल्पा सुर्वे तसेच या योजनेचे रत्नागिरीचे काम पाहणारे महेश सामंत उपस्थित होते.
श्री. राऊत म्हणाले, यापूर्वी असलेल्या सरकारणे फक्त २ कोटी रुपये राज्यात मुख्यमंत्री सहायता निधी वितरीत केला होता. परंतु एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानतंर अडिच वर्षांमध्ये त्यांनी ३०१ कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधी खर्च केला आहे. सर्वांत जास्त सहयता निधी खर्च करणारे हे मुख्यमंत्री आहेत. हा निधी मिळण्यासाठी विहित नमुन्यत अर्ज करण्याची गरज आहे. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तहसीलदार कार्यालयातील उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. यापूर्वी उत्पन्नाची मर्यादा १ लाख ६० हजार होती. त्यामध्ये आता वाढ केली असून ३ लाख ६० हजार मर्यादा करण्यात आली आहे. आधार कार्ड, रेशनकार्ड, आजाराचे रिपोर्ट, अपघातग्रस्ताची एफआयआर आवश्यक आहे. या योजनेमध्ये २० आजारांचा समावेश आहे. त्यामध्ये आणखी सात आजार वाढविण्यात येणार आहेत. यामध्ये हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडणी, फुफ्फुस, हाताचे प्रत्यारोपण, कर्करोग, अपघात शस्त्रक्रिया, लहान बाळाची शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, डायलसीस, जळीत, विद्युत अपघात आदींचा समावेश आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहयाता निधी कक्षाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी आरोग्य वारी आपल्या दारी ही योजना राबविण्यात आली आहे. या योजनांचे लाभ मिळण्यासाठी काही हॉस्पिटल निश्चित करण्यात आले आहेत. त्यांना देखील राऊत यांनी भेट देऊन माहिती घेतली. हा कक्ष आपल्या कुटुंबाच्या पाठी सदैंव उभा राहिल, असा विश्वास श्री. राऊत यांनी दिला.