रत्नागिरी:- शहरातील वरचा फगरवठार येथे खोलीच्या वादातून मुलीने आईला मारहाण करत सोन्याची चेन हिसकावून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी दुपारी 1 च्या सुमारास घडली. वैशाली विलास वालम (रा वरचा फगरवठार, रत्नागिरी) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मुलीवर पोलिसांनी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली वालम या राहत असलेली खोली खाली करावी यासाठी त्यांच्या मुलीकडून सातत्याने दबाव टाकण्यात येत होता. ही खोली विकून आम्ही चार पैसे मिळवू, असे मुलीकडून आईला म्हणजे वैशाली यांना सांगण्यात आले होते. खोली रिकामी करण्यास वैशाली यांनी नकार दिल्याने 1 सप्टेंबर 2024 रोजी त्यांची मुलगी त्यांच्या घरी आली. यावेळी झालेल्या वादावादीतून वैशाली यांना त्यांच्या मुलीने मारहाण केली तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली, अशी तक्रार वैशाली यांनी शहर पोलिसात दाखल केली.