रत्नागिरी:- तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास शहरातील गोडबोले स्टॉपनजिक हा प्रकार घडला. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पक्षांतर्गत वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. या हल्ल्यात पक्षातीलच एका नेत्याचा हात असल्याचा आरोप रुपेश जाधव यांनी केला आहे. दरम्यान या प्रकाराने रत्नागिरी शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मनसे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव हे आपल्या गोडबोले स्टॉप येथील कार्यालयात बसले होते. रात्री 9 वाजता कार्यालय बंद करुन ते बाहेर पडले. यावेळी मागून येणार्या 4 ते 5 जणांनी त्यांच्यावर लाठ्या काठ्या घेऊन हल्ला केला. यावेळी रुपेश जाधव यांना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. जखमी अवस्थेत रुपेश जाधव यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली तसेच एक्स रे व अन्य चाचण्या करण्यात आल्या. पक्षातील एका वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरुन हा हल्ला केला गेला असल्याचा आरोप जखमी रुपेश जाधव यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.