रत्नागिरी:- ज्येष्ठ शास्त्रज्ञ व मानवतावादी विचारवंत पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर, प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉ.विकास आमटे आज रत्नागिरीत उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या ‘उदयपर्व’ कार्यअहवाल प्रकाशन सोहळा, त्यापूर्वी रत्नागिरी पालिकेच्या भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम सायन्स गॅलरी विकसित करणे विकासकामाचा लोकार्पण सोहोळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी विविध योजनांच्या माध्यमातून मतदारसंघासह जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. गेल्या 20 वर्षात मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यात ना.सामंत यांना यश आले आहे. पायाभूत सुविधांसह शैक्षणिक हब रत्नागिरीत उभारण्यात आले. त्याचबरोबर पर्यटन, एमआयडीसीमार्फत विविध योजना, सुविधा रत्नागिकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. ना.सामंत यांनी केलेल्या कार्याचा अहवाल आज मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित केला जाणार आहे. स्वा. वि.दा.सावरकर नाट्यगृहात आज सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तत्पूव सकाळी 10.30 वाजता जुना माळनाका येथील श्रीमान हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणात भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम सायन्स गॅलरीचा लोकार्पण सोहोळा होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमाला रत्नागिरीकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, पालिका मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केले आहे.