रत्नागिरीत परराज्यातील सापडली 18 स्थलांतरित मुले

रत्नागिरी:- बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 या कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. मात्र, स्थलांतरित बालकांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. बहुसंख्य बालकेही परराज्यातील असल्याने त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात परराज्यातील 18 मुले स्थलांतरित सापडली आहेत.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क, अधिकार अधिनियमाच्या अनुषंगाने सर्व शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. मात्र, हे करताना शिक्षण विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुळात पराज्यातील मुलांना प्रवाहात आणताना भाषेचा प्रश्न आड येत आहे. या मुलांना मराठी येत नसल्याने शिक्षण देताना शिक्षकांना डोकेदुखी ठरत आहे.

शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरीत मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी 5 जुलै ते 20 जुलै या कालावधीत सर्वेक्षण करण्यात आले. 3 ते 18 वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण या कालावधीत करण्यात आले. जिल्ह्यात शाळाबाह्य मुले सापडली नसली तरी स्थलांतरीत मुले सापडली आहेत. या सर्व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले आहे.
परराज्यातील अनेक कुटुंबे जिल्ह्यात विविध व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतर करत असतात. गेल्या काही वर्षापासून शिक्षण विभागाला ही डोकेदुखी ठरत आहे. यावर्षी कर्नाटक 5, झारखंड 1, उत्तर प्रदेश 5, हिमाचल प्रदेश 1, नेपाळ 2 अशी 14 तर कोल्हापुरातून 1 व जिल्ह्यांतर्गत 3 अशी एकूण 18 मुले या मोहिमेदरम्यान सापडली आहेत. या सर्व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले आहे.