कोकण एक्स्प्रेस हायवेच्या मोजणीला काळबादेवीत कडाडून विरोध

मोजणीसाठी आलेल्यांना घेराव; ना. सामंत यांच्याकडून हस्तक्षेप

रत्नागिरी:- कोकण एक्स्प्रेस हायवे प्रकल्प अंतर्गत जमिनीच्या मोजणीसाठी मंगळवारी सकाळी जागा मोजणीसाठी अधिकाऱ्यांचे पथक काळबादेवी येथे दाखल झाले. काही दिवसांपूर्वी येथील ग्रामस्थांना जागा मोजणीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र मंगळवारी सुरू होणाऱ्या जागा मोजणीला स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. कोकण कोस्टल हायवे कुठून जाणार? रस्ता किती फुटांचा होणार? किती घरे बाधित होणार? याची उत्तरेच अधिकाऱ्यांकडे नव्हती. अखेर ही बाब पालकमंत्री उदय सामंत यांच्या कानावर घालण्यात आली. पालकमंत्री ना. सामंत यांनी जागा मोजणीचे काम थांबवण्याच्या सूचना करताना याबाबत पालकमंत्री, स्थानिक ग्रामस्थ, जिल्हाधिकारी यांची एकत्रित बैठक घेण्याचे आश्वासन स्थानिक ग्रामस्थांना दिले.

मुंबई गोवा हे अंतर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून कोकण एक्स्प्रेस हा नवा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. एकूण 22 गावांतून हा प्रकल्प जाणार असून यामुळं मुंबई ते गोवा प्रवास 6 तासांत पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प एकूण 363 किमी लांबीचा असणार असून सहा मार्गिकांचा आहे. अलिबागच्या शहाबाज येथून हा महामार्ग सुरू होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथपर्यंत जाणार आहे.

या महामार्गाच्या कामाला आता वेग आला असून या मार्गावरील विविध गावातून भूसंपादन मोजणीसाठी मंगळवारी अधिकारी दाखल झाले. रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी गावातील ग्रामस्थांना मोजणी बाबत यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मंगळवारी सकाळी मोजणी अधिकारी जागा मोजणीसाठी काळबादेवी गावात दाखल झाले. जागा मोजणीसाठी अधिकारी आल्याची खबर मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत या मोजणीला कडाडून विरोध केला. ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी संबंधित खात्याचे अधिकारी च जाग्यावर हजर नव्हते. मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे कोणतीच माहिती उपलब्ध नव्हती. कोस्टल हायवे कुठून जाणार? रस्ता किती पदरी होणार? किती घरे बाधित होणार? घरे तोडून मानवी वस्तीतून रस्ता काढण्यापेक्षा किनारी भागातून रस्ता काढावा, असे स्पष्ट करत ग्रामस्थांनी मोजणी थांबवली. याबाबत शंभर ग्रामस्थांनी तसे पत्र सर्व्हे विभागाला दिले. स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता दोन दिवसांपूर्वी स्थानिकांना भूसंपानदनासाठी नोटीस आली. वस्तीतून हा सागरी मार्ग जात असल्याने अनेकांची घरे उद्ध्वस्त होणार आहेत. ज्यांनी घरे जाणार आहेत, त्यांना पर्यायी जागा देखील नाही. आमचा या विकासाला किंवा महामार्गाला विरोध नाही. परंतु आमची घरे तुटणार असतील तर आमचा या महामार्गाला विरोध राहिल. काळबादेवी धुपप्रतिबंधक बंधार्‍याच्या बाजूने हा महामार्ग घ्यावा. परंतु आम्ही घरे तोडुन हा मर्ग होऊ देणार नाही, अशी ठाम भुमिका मांडत काळबादेवीवासीयांनी या सर्व्हेला विरोध करून काम थांबविले.

येथील शाखा प्रमुख संदेश बनप यांनी विधानसभा क्षेत्रप्रमुख आबा पाटील यांच्याशी संपर्क साधत सर्व माहिती दिली. यानंतर सध्या अमरावती दौऱ्यावर असणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या कानावर ही घटना टाकण्यात आली असता त्यांनी तत्काळ ही मोजणी थांबवण्याचे आदेश दिले आहेत. काळबादेवी वासियांची घरे जाऊ देणार नाही, त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.