फेक न्यूजमुळे एखाद्याचे करिअर बाद करतोय का, हा विचार मनात आला पाहिजे: ना. सामंत

रायगड, सिंधुदुर्गसह रत्नागिरीतील पत्रकारांची कार्यशाळा संपन्न

रत्नागिरी:- सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ताकद ही खऱ्या अर्थाने पत्रकारिता आहे. समाज माध्यमांवर येणाऱ्या फेक न्यूजमुळे समोरच्याचे करिअर बाद करतोय का, हा विचार प्रत्येकाच्या मनात आला पाहिजे. त्यासाठी जोपर्यंत खात्री होत नाही, तोपर्यंत ते फॉरवर्ड करणे धोक्याचे आहे. रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने होणाऱ्या प्रांत कार्यालयात पत्रकार कक्ष असेल, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांसाठी विकास पत्रकारिता कार्यशाळेचे येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री श्री.सामंत यांच्या हस्ते आद्यपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन, कार्यशाळेला सुरुवात झाली. यावेळी उपसंचालक डॉ. गणेश मुळे, सेवानिवृत्त उपसंचालक सतीश लळीत, रायगडच्या जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य जान्हवी पाटील, कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष श्रीकांत चाळके, सदस्य प्रणव पोळेकर, रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदचे अध्यक्ष आनंद तापेकर, सिंधुदुर्ग पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक मीडिया फोरमचे अध्यक्ष राजन नाईक, मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष मेहरुन नाकाडे, ज्येष्ठ पत्रकार दत्ता महाडिक आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, पत्रकारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिल्ह्याचा, कोकणचा, आपल्या भागाचा विकास हे पत्रकारांच्या डोक्यात असते. सध्या राज्याला विकास पत्रकारितेची खरी आवश्यकता आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड तळ कोकणातील पत्रकारांनी नव्या तंत्रज्ञानात काम केले पाहिजे. त्यासाठी एकमेकांमध्ये संवाद होण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. समाज माध्यमातून फेक नॅरेटिव्हमधून पॉलिटिकल करिअर बाद होऊ नये, याची देखील काळजी घेतली पाहिजे. समाज माध्यमांवर मोबाईलच्या सहाय्याने काहीही टाईप करायचे, समोरच्याला पाठवायचे, समोरच्याने आणखी त्यात भर घालायची आणि आणखी पुढे पाठवायचे, मग ते चांगले असू शकते वा वाईट असू शकते. सोशल मीडियाला संहिता नसल्याने कोणीही मत व्यक्त करु शकते. या सर्वामध्ये विशेषत: फेक बातमीमुळे समोरच्याचे करिअर बाद करतोय काय, हा देखील विचार प्रत्येकाच्या मनात आला पाहिजे.

जिल्ह्यात लवकरच स्वतंत्र पत्रकार भवन निर्माण होणार आहे. पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी शासनस्तरावर निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल. समाजातील सर्वसामान्य माणसांसाठी शासनाच्या विविध योजना, शासन स्तरावर झालेले निर्णय हे आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून पोहचवावेत, असे आवाहन पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले कोकणातील पत्रकारांनी अभ्यासपूर्ण लेखन करून कोकणच्या विकासात अजून काय नवे बदल करता येतील, याबद्दल मार्गदर्शन करण्याची अपेक्षा आहे. यासाठी पत्रकारांनी अन्य जिल्ह्यात जी विकास कामे सुरू आहेत त्यातील चांगले काय आपल्या जिल्ह्यात येऊ शकेल, याचाही अभ्यास करावा. जिल्ह्याने आतापर्यंत जी कामे केली आहेत त्या कामांचा संपूर्ण महाराष्ट्रात एक पॅटर्न निर्माण झाला आहे. याचा मला अभिमान आहे, असेही ते यावेळी म्हणाले. आपल्या बातमीचा समाजावर विरुद्ध परिणाम होणार नाही, याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

उपसंचालक डॉ. मुळे म्हणाले पालकमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाला पत्रकारांशी सुसंवाद साधण्याकरिता एक उत्तम व्यासपीठ या माध्यमातून मिळाले आहे. कोकणातल्या तीन जिल्ह्यातील पत्रकारांना एकत्र आणून आयोजित केलेली ही महाराष्ट्रातील पहिलीच कार्यशाळा आहे. ही संधी माहिती कार्यालयाला मिळाली, प्रशासकीय पातळीवर या संधीचं सोनं केल्याबद्दल जिल्हा माहिती अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक करतो. पत्रकारिता करताना सत्य आहे, ते सत्य सांगावे. असत्य असेल तर असत्य सांगावे एवढीच अपेक्षा पत्रकारांकडून असते. आजच्या काळात संशोधन पत्रकारिता महत्त्वाची आहे त्यासाठी विविध संदर्भ आणि शासन निर्णयांचा अभ्यास केला पाहिजे.

मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘माझी लाडकी बहीण’ या योजनेची प्रचार प्रसिध्दी मोठ्या प्रमाणात करावी. ही योजना शहरापासून गावागावापर्यंतच्या प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचावी यासाठी विशेष प्रयत्न करावेत.

माहिती व जनसंपर्क महासंचालनाल्यातील सेवानिवृत्त उपसंचालक श्री. लळीत यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, समाज माध्यम आणि फेक न्यूजबद्दल सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, अशा प्रकारच्या संवादाचे कार्यक्रम नेहमी होणे आवश्यक आहे. या कार्यशाळेसाठी माहिती व जनसंपर्कच्या कोकण विभागाने आघाडी घेतली त्याबद्दल विशेष आनंद आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे फेक न्यूज, फेक व्हिडिओज तयार केले जातात. विकसित तंत्रज्ञानाचा योग्य वापर पत्रकारांनी करणे आवश्यक आहे. आपले जीवन सामाजिक माध्यमांच्या आहारी गेले आहे. समाज माध्यमांमुळे मानसिक रोगांचे प्रमाण वाढले आहे. याचा अकारण वापर होतो आहे. तो नियंत्रित केला पाहिजे. फेक न्यूज थांबवणे जरी आपल्या हाती नसले, तरी ते पुढे पाठविणे थांबविणे आपल्या हातात आहे. त्यामुळे त्याचे उगमस्थान शोधा, ते तपासा, शीर्षकापलिकडे पहा, अन्य सूत्रांचा आधार घ्या, प्रसिध्दीची तारीख पहा, जाणकारांना विचारा आणि आलेली माहिती न समजून घेता आणि न पाहता पुढे पाठवणे चुकीचे आहे.

यावेळी उपस्थित पत्रकारांनी आधीस्विकृती पत्रिका, पत्रकारांना घरे, पत्रकारांसाठी आरोग्य सुविधा, पत्रकारांवर होणारे हल्ले या यासंदर्भातील प्रश्नांवर पालकमंत्र्यांशी चर्चा केली.
जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. रायगड जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती पिंगळे यांनी सर्वांचे आभार मानले. पत्रकार अनघा निकम यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळेला रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.