खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील गळती थोपवण्याचा राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रयत्न फोल ठरले असून, बोगद्यातून गळती सुरूच आहे. बोगद्यातील कामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही गळती थांबलेली नाही. त्या रोखण्यासाठी “ग्राऊटिंग “चा अवलंबही फोलच ठरल्याने वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला आहे.
गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांची बोगद्यातील “वाट” खडतर राहणार असल्याचे दिसून येत आहे. बोगद्यात ठिकठिकाणी लागलेल्या वाहनचालकांच्या गतिमान प्रवासात “विघ्न” निर्माण झाले आहे. बोगद्यातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने ग्राऊंटिंगचा अवलंब केला. यासाठी ५ हजारांहून अधिक सिमेंट बॅगांचा वापर केल्यानंतर गळती थोपवण्यात यश आल्याचा दावाही राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून केला जात होता. मात्र, बोगद्यात गळती सुरूच आहे. त्यामुळे महामार्ग खात्याची डोकेदुखी वाढली आहे. मुंबईतील आयआयटीचे प्रा. एस. के. यांनीही प्रत्यक्ष बोगद्याची पाहणी करत राष्ट्रीय महामार्ग खात्याला सूचनाही केल्या होत्या. तज्ज्ञांच्या सल्ल्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे या गळतीमुळे स्पष्ट झाले आहे.