एमआयडीसी परिसरात पुन्हा सापडले गोवंशाचे अवशेष

रत्नागिरी:- गेल्या महिन्यात शहरातील मिरजोळे-एमआयडीसी येथे गोवंशीय हत्या प्रकरण घडले होते. हे प्रकरण ताजे असतानाच त्याच परिसरातील कचऱ्याच्या ठिकाणी रविवारी (ता. ४) सकाळी साडेआठच्या सुमारास गोवंशिय पायांची दोन हाडे आणि बाजूच्या झाडीत निदर्शनास आल्याचा प्रकार उघडकीस आल्याने पुन्हा परिसरात खळबळ उडाली आहे.

रविवारी सकाळी एमआयडीसी रेल्वे पुलाजवळील रस्त्यावर कचऱ्याच्या ठिकाणी बाजूच्या झाडीत तेथील नागरिकांना गोवंशीय हाडे दिसून आली. गोवंशीय दिसताच क्षणी नागरिकांनी तात्काळ ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितिन ढेरे यांनी आपल्या टिमसह घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी त्या परिसराची पाहणी करुन फोटो घेत पंचनामा केला. त्यानंतर ती हाडे ताब्यात घेण्यात आली. मिळालेली हाडे नेमकी कोणत्या प्राण्यांची आहेत त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी प्रयोगशाळेत पाठवली आहेत.
यापूर्वी घडलेल्या गोवंशिय हत्या प्रकरणीत माजी खा. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू संघटनांनी मोर्चा काढल्यामुळे पोलिस विभागाला या प्रकरणाची गांभिर्याने दखल घ्यावी लागली होती. त्या प्रकरणात बलबले याला अटक झाली होती. परंतू रविवारी सकाळी पुन्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. कचऱ्याच्या ठिकाणी ही हाडे कुत्र्यांनी ओढून आणल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. मात्र यापुर्वी घडलेल्या घटनेमुळे ग्रामीण पोलिस ठाण्याकडून तपास सुरु आहे.