जिल्ह्यात दोन महिन्यांतील अतिवृष्टीने 36 कोटींची हानी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात यंदाच्या पाऊस हंगामाच्या दोन महिन्यात पावसाने अडीच हजार मि. मी.ची सरासरी गाठली आहे. पावसाळी हंगमातील या दोन महत्वाच्या महिन्यातच पाऊस जोरदार पडतो. त्यानंतर पावसाचा जोर कमी होतो. या दोन महिन्यात पावसाने चारवेळा रत्नागिरी जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण केली. गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत यंदाचा पावसाची वाचटाल सध्या तरी समाधानकारक आहे. पावसाच्या या दोन महिन्यात अनेक भागात झालेल्या अतिवृष्टमुळे जिल्ह्यात सुमारे 36 कोटीची हानी केली आहे.

यंंदा पाऊस वार्षिक सरासरीपेक्षा 6 ते 15 टक्के अतिरिक्त होणारअसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बिगर मोसमीची सुरवात मे अखेरीस झाली. त्या नंतर मोसमी पाऊस नियोजित 7 जुलै रोजी सुरू झाला. मात्र, अन्य भागात झालेल्या वादळाच्या प्रभावाने कोकणातील मोसमी वार्‍याचा वेग आणि दिशा या दोन्हीत बदल होऊन पावसाचे वेळापत्रक नेहमीप्रमाणे निश्चित झाले. मात्र 1 जूनपासून पावसाने हलक्या स्वरुपात सुरुवात केली तर जून अखेरपर्यंत मासिक सरासरीही गाठली.

नियमित पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकर्‍यांनी खरिपाची बेगमी सुरू झाली. तसेच जुलैमध्येही पावसाने सातत्य राखल्याने लावणीची कामेही वेळेवर झाली. 77 टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षाच्या तुलनेत 15 ते 18 टक्के पाऊस जादा झाला आहे. अजूनही पावसाचे दोन महिने शिल्लक आहेत. आतापर्यंत 2355 मिलिमीटर एकूण पाऊस पडला असू, पावसाची सरासरी 2623 मि. मी. झाली आहे. हाच जोर राहिला तर काही दिवसांतच जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीसाठी आवश्य असलेला हजार मि.मी. पाऊस पडणार आहे. मात्र, या वादळी पावसाने पहिल्या दोन महिन्यातच जिल्ह्यात तब्बल 36 कोटी 67 लाख 57 हजार रुपयांचे नुकसान केले आहे.

या कालावधित जिल्ह्यातील प्रमुख नद्यांतील जलस्तर चारवेळा वाढून अनेकदा या भगात पूरस्थिती निर्माम केली. गेले दोन महिने सतत मुसळधार पडणार्‍या पावसाने नद्यांलगत असलेल्या तालुक्यांमध्ये नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. जोडीला वार्‍याचा मारा जोरदार असल्याने पडझड मोठ्या प्रमाणावर होत आहे. घरे, गोठे, दुकाने, शाळा, इमारती, साकव, पूल, सार्वजनिक विहिरी यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.

जिल्ह्यातील प्रमुख नद्यांचे पात्र कधी इशारा पातळीवर तर कधी धोक्याच्या पातळीवर जात असल्याने तालुक्यांचेही जनजीवन विस्कळीत झाले. अनेक दुर्गम आणि पूरप्रवण भगातील आतापर्यंत अडीचशे कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे लागले. वादळी पावसामुळे जिल्ह्यात पडझडीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. वादळी वार्‍याच्या मार्‍यामुळे आणि मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे जिल्ह्यात अपरिमित हानी झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या, बांधकाम विभागाचे रस्ते, संरक्षण भिंती, साकव, इमारती, पूल मोर्‍या यांना या पावसाचा फटका बसला आहे. महावितरणचे वीजखांब आणि ट्रान्सफॉर्मर; तसेच पाणीपुरवठा विभागाच्या पाइपलाईन आणि विहिरी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

काही भागात घरे, गोठे, दुकाने आणि या सर्व यंत्रणांचे मिळून 1 जून ते 31 जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीतच जिल्ह्यात तब्बल 36 कोटी 67 लाख 57 हजार रुपयांचे नुकसान झाले. मुसळधार पावसाने प्रमुुख नद्यांनी जलस्तर ओलांडल्याने आलेल्या पुराने नदीकिनारी भगात असलेल्या 21 गावातील 159 शेतकर्‍यांची सुमारे 15 हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले. या कालावधीत पक्क्या घरासहित अनेक मालमत्तांचे अंशतः तर काही भागात पूर्णतः नुकसान झाले. यामध्ये 238 अंशतः घरांचे 8 कोटी 74 लाख 11 हजार 766 रुपयांचे नुकसान झाले तर पूर्णतः 317 घरांचे 16 कोटी 61 लाख 42 हजार 796 रुपयांचे नुकसान झाले. अंशतः आणि पूर्णत: गोठ्यांचे दोन कोटी दहा लाख 8 हजार 945 रुपयांचे नुकसान झाले. 91 खासगी मालमत्तांचे पाचकोेटी 30 लाख 48 हजार 600, सार्वजनिक मालमत्तांच दोन कोटी 47 लाख 25 हजार 950, तर व्यापारी व्यस्थापनांचे तीन कोटी 27 लाख 75 हजार 505 रुपयांचे नुकसान झाले. मुसळधार पावसाने जिल्ह्यातील 12 जनावरे दगावल्याने दोन लाख 5 हजारांची हानी झाली. रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या दणक्याने जिल्ह्यातील 187 गावातील गावातील 388 महावितरण रोहित्रावरील वीजपुरवठा बाधित झाला. त्यामुळे कृषी ग्राहकांचा आणि 4 680 अकृषक वीज ग्राकांचा वीज पुरवठा प्रभावित झाला.