जिल्ह्यातील १ हजार १२० गावे ओडीएफ प्लस

रत्नागिरी:- जिल्ह्यात स्वच्छता चळवळ गतिमान झाली आहे. जिल्ह्यातील गावे हागणदारी मुक्त होण्यासोबत गावांमध्ये सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन कामेे पूर्ण करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील 1 हजार 533 गावांपैकी 1 हजार 120 गावे ओडीएफ प्लस घोषित करण्यात आली आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात 846 ग्रामपंचायती असून, 1 हजार 533 महसुली गावे आहेत. यामधील आतापर्यंत 1 हजार 120 गावे ओडीएफ प्लस झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार व पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी दिली आहे.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण झालेल्या व हागणदारीमुक्त झाल्याचे निकष पूर्ण करणार्‍या जिल्ह्यातील गावांना ‘ओडीएफ प्लस’चा दर्जा देण्यात येत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभाग अंतर्गत ओडीएफ प्लस अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. ओडीएफ प्लसमध्ये वैयक्तिक शौचालय बांधकाम व त्याचा वापर करणे, त्याची शाश्वती राखणे, गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणे, शाळा अंगणवाडी तसेच सर्व सार्वजनिक व संस्थांमध्ये स्वच्छताविषयक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, गाव स्वच्छ ठेवणे आदी कामे करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व गावांनी हागणदारीमुक्त अधिक म्हणून घोषित करण्यासाठी जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभाग अधिकारी, कर्मचारी, पंचायत समिती गट विकास अधिकारी, सरपंच व ग्रामसेवकांनी महत्वपूर्ण योगदान दिले.