रत्नागिरी:- रत्नागिरीच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश मिळवून स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना शिकवायला अधिव्याख्यातेच नसल्याचे पुढे आले आहे. मॅकेट्रॉनिक्स हा अभ्यासक्रम 23-24 मध्ये पहिली बॅच पदविका धारण करून बाहेर पडली तरी अजूनही अभ्यासक्रमासाठी पायाभूत सुविधांसह अधिव्याख्यात्यांची वानवा आहे. मंजूर पदांपेक्षा 50 टक्के पेक्षा कमी अधिव्याख्याते संस्थेत कार्यरत आहेत.
रिक्त पदांमुळे तासिका तत्वावर अभ्यागत अधिव्याख्यात्यांची नेमणूक करून काम चालविले जात आहे. शासनाने तासिका तत्वावरील अध्यापकांच्या नियुक्तीही थांबविल्याने इंजिनिअरिंगचे स्वप्न पाहणार्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
मागील शैक्षणिक वर्षात तासिका तत्वावर विद्यार्थ्यांना शिकविणार्या अधिव्याख्यात्यांना सप्टेंबर 2023 पासूनचे मानधन दिले गेले नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.’लाडकी बहिण’ योजना राबविणार्या सरकारचे शिक्षणाकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे.
रत्नागिरीच नव्हे तर राज्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये रिक्त जागांचा प्रश्न गंभीर आहे. राज्य शासनाने लाडक्या बहिणीसाठी महिन्याला पैसे देणारी योजना अमलात आणली. व्यावसायिक शिक्षण घेणार्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. एकीकडे राज्य शासनाकडून योजनांची खैरात केली जात असली तरी शासकीय तंत्रनिकेतनमधील मुलांचे भवितव्य व्याख्यात्यांच्या रिक्त पदांमुळे अंधारात असल्याची स्थिती आहे.
रत्नागिरी शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत मेकॅट्रॉनिक्स हा अभ्यासक्रम 60 च्या प्रवेशक्षमतेत सुरू करण्यात आला. शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून हा अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये पहिली बॅच पदविका धारण करून बाहेर पडली आहे. तरी या संस्थेच्या रिक्त पदाचा प्रश्न गंभीर आहे. या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा संस्थेत उपलब्ध नाहीत.
विद्यार्थ्यांना वर्ग खोल्या, प्रयोगशाळा, त्यास लागणारी साधनसामुग्री, यंत्रसामुग्री उपलब्ध नाही. संस्थेतील 10 अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने मंजूर पदे 79 आहेत. त्यापैकी 38 पदे भरण्यात आली आहेत. म्हणजे 50 टक्के पेक्षा कमी अधिव्याख्याते संस्थेत कार्यरत आहेत. रिक्त पदांच्या अनुषंगाने तासिका तत्वावर अभ्यागत अधिव्याख्यात्यांची नेमणूक करून सैध्दांतिक व प्रात्यक्षिक पूर्ण करून घेतली जातात. परंतु तासिका तत्वावरील अध्यापकांच्या नियुक्ती बाबतची कार्यवाही करण्यात येवू नये, असे शासनाने सूचित केले आहे. त्यामुळे रत्नागिरी तंत्रनिकेतन शिक्षकाविना असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.
रत्नागिरी शासकीय तंत्रनिकेतनची रिक्त पदांची अनेक वर्षांपासूनची स्थिती आहे. शासनाने रिक्त पदे तत्काळ भरण्याची आवश्यकता आहे. त्याबाबतचा शासनाशी पत्रव्यवहारही सुरू असल्याचे प्रभारी प्रचार्य राजीव वाकोडकर यांनी सांगितले.