खेड:- खेड शहरासह भरणेत २ महिन्यापूर्वी १०० रूपयांच्या बनावट नोटा चलनात आल्याचा प्रकार उघडकीस आलेला असतानाच वेरळ येथील एका हॉटेलमध्ये गुरूवारी २०० रूपयांची बनावट नोट चलनात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. बनावट नोटा आढळण्याचे सत्र सुरूच असल्याने व्यापारी धास्तावले आहेत.
मुंबईत बनावट नोटाप्रकरणी चिपळूण व खेडच्या चौघांना अटक करण्यात आली आहे. शिरळ, पाचाडसह तालुक्यातील संगलट येथील चौघांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. अटकेतील संशयितांनी खेड व चिपळूण परिसरात बनावट नोटा चलनात आणल्याची दाट शक्यता आहे. याचमुळे शहरासह भरणे व वेरळ येथे बनावट नोटा आढळत आहेत. गुरूवारी वेरळ येथील एका हॉटेलमध्ये बनावट नोट आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्राहकांकडून हॉटेल व्यावसायिकाने बिलापोटी रक्कम स्वीकारली होती. या रक्कमेत २०० रूपयांच्या बनावट नोटेचाही समावेश होता. मात्र ही नोट बनावट असल्याचे व्यावसायिकाच्या निदर्शनास आले नाही. हीच नोट एका दुकानात चलनात आल्यानंतर बनावट नोट असल्याचे उघड झाले. या प्रकाराने खळबळ उडाली असून व्यापारीही सतर्क झाले आहेत. ग्राहकांकडून देण्यात येणाऱ्या नोटा पारखण्यास सुरूवात केली आहे. बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान यंत्रणांसमोर आहे.