खेड:- मुंबई गोवा महामार्गावरील लोटे एमआयडीसीमध्ये आठवड्याभरात दुसरी वायू गळतीची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी येथील पुष्कर कंपनीत लागलेल्या आगीत चारजण जखमी झाले होते. मात्र काल मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या एक्सेल इंडस्ट्रीज मध्ये वायू गळती झाल्याने खळबळ उडाली. यामध्ये चौघांना श्वसनाच्या त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दगडू चाळके, वेदिका चाळके, जयश्री चाळके, विधी चाळके अशी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चौघांची नावे आहेत. यामध्ये एका तीन वर्षीय बालिकेचा समावेश आहे.
दरम्यान गॅस लिकेज झाल्याची प्रत्यक्षदर्शीनी माहिती दिली. ग्रामस्थांना परशुराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कंपनी गेट समोर ठिय्या धरला होता. ग्रामस्थांना कंपन्यांमध्ये माहिती दिली जात नाही, सोडले जात नाही अशी तक्रार ग्रामस्थांकडून केली जात आहे. चार दिवसांपूर्वीच पुष्कर कंपनीमध्ये लागलेल्या आगीत चार कामगार जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे पुन्हा एकदा लोटे एमआयडीसी चर्चेत आली आहे.