शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील संकुलांच्या कचऱ्याचे होणार व्यवस्थापन

रत्नागिरी:- स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-2 अंतगत मार्च 2025 अखेर रत्नागिरी जिल्हयातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रातील महसूल गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार करुन गावे हागणदारीमुक्त अधिक उत्कृष्ठ करण्याबाबत केंद्र शासनाने व राज्य शासनाने सुचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने सर्व ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

शहरालगतच्या ग्रामपंचायतींच्या परिक्षेत्रामध्ये निवासी संकुलाचे प्रमाण जास्त आहे. सद्यस्थितीला असे निदर्शनास आले आहे की, शहरालगतच्या ग्रामपंचायतींच्या परिक्षेत्रामधील निवासी संकुलामध्ये घनकचरा व्यवस्थापन सुविधा नसल्याने सदर निवासी संकुलामधील कचरा इतरत्र टाकला जात असल्याचे दिसून आले आहे. तथापि, शहरालगतच्या ग्रामपंचायती लोकसंख्येने मोठ्या आहेत. तसेच सदर ग्रामपंचायतींची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशा शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये निवासी संकुलांची संख्या अधिक असल्याने येथे मोठ्या प्रमाणात घनकचरा तयार होत आहे. सदर कचऱ्याचे व्यवस्थापन निवासी संकुलांमध्येच केल्यास सार्वजनिक स्तरावर कचरा व्यवस्थापनाचा भार कमी होईल व एकूणच गावचे घनकचरा व्यवस्थापन करणे देखील सोईचे होईल. त्याकरीता मा.श्री.किर्तीकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी तालुक्यातील शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायत शिरगांव, मिरजोळे, पोमेंडी बु., कर्ला, कुवारबांव, नाचणे, खेडशी यांचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांची बैठक गुरुवार दि.20/06/2024 रोजी सायं.4.00 वाजता मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या दालनात संपन्न झाली.

सदर बैठकीमध्ये रत्नागिरी तालुक्यातील शहरालगतच्या 7 ग्रामपंचायतीमध्ये कचऱ्याचे ढिगारे सार्वजनिक ठिकाणी असल्याचे निदर्शनास आल्याबाबत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चर्चा केली. त्यावर ठोस उपाययोजना करुन अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याबाबत स्पष्ट केले. त्याकरीता रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे व नाचणे येथील निवासी संकुलांना भेट देऊन तेथील रहिवासी तयार करीत असलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन (कंपोस्टींग) अतिशय उत्तम व चांगल्या प्रतीचे असल्याबाबत अधोरेखित केले. त्या धर्तीवर शहरालगतच्या सर्व ग्रामपंचायतींनी त्यांच्या परिक्षेत्रात असलेल्या सर्व निवासी संकुलांना कचऱ्याचे व्यवस्थापन स्व:खर्चाने त्यांच्या स्तरावर करण्याकरीता प्रेरीत करावे. तसेच सदर बाबत जनजागृती व प्रचार प्रसिध्दी करण्याबाबत आवाहन केले.

सद्यस्थितीला सार्वजनिक ठिकाणी जेथे कचरा टाकला जातो अशा सर्व ठिकाणांवर सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात यावेत. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांना पावती पुस्तक घेऊन गस्त घालण्याबाबत सुचित करावे. तसेच कचरा उघड्यावर टाकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी. व पोलीस विभागाच्या सहाय्याने कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या. तत्पुर्वी उघड्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल याबाबत ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करुन प्रसिध्दी द्यावी. तसेच ओल्या कचऱ्यावर कंपोस्टींग कशा पध्दतीने केले जाते याबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करावी.
ओला कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण कंपोस्टींग तंत्रज्ञान सर्व ग्रामपंचायतीमध्ये राबवित आहोत. परंतु ओल्या कचऱ्यासोबत प्लास्टीकचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे ओल्या कचऱ्यासोबतच प्लास्टीक कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. याकरीता ग्रामपंचायत स्तरावर प्लास्टीक बंदी करण्यात यावी. तसेच सर्व चिकन, मटण व इतर सर्व दुकानात प्लास्टीक पिशव्या वापरण्यावर बंदी करावी. तशा लेखी सुचना सर्व व्यापाऱ्यांना देण्यात याव्यात. त्याचबरोबर ग्रामपंचायत स्तरावर प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती करावी. तद्नंतर प्लास्टीक पिशव्या सापडल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतीने करावी. जेणेकरुन प्लास्टक वापरावर बंदी घालणे सोईचे होईल.
ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करणेसाठी बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या कमी खर्चाचे ड्रम कंपोस्ट व पीट कंपोस्ट तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन निवासी संकुल व्यवस्थापनाकरीता ग्रामपंचायतीने आयोजित करावे. त्यासाठी ग्रामपंचायतीने सदर तंत्रज्ञानाचा वापर करुन निवासी संकुलामध्ये तयार होणारा ओला कचरा निवासी संकुलामध्येच प्रक्रिया करुन त्याचे खत तयार करता येईल. याबाबत निवासी संकुल व्यवस्थापनाने सर्व कुटुंबांना अवगत करावे. व त्याची अंमलबजावणी तात्काळ निवासी संकुल व्यवस्थापनाने करावी. अशा सुचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या.

या बैठकीला मा.श्री.किर्तीकिरण पुजार- मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी, मा.श्री.परिक्षित यादव- अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी, मा.श्री.राहुल देसाई- उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं. व पा.वस्व.), मा.जे.पी.जाधव- गट विकास अधिकारी, पंचायत समिती रत्नागिरी, श्री.पी.एन.सुर्वे, श्री.पऱ्हाते, श्रीम.शिरधनकर- विस्तार अधिकारी (पं.), पंचायत समिती रत्नागिरी, 7 ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, श्री.अविनाश भोईर- उप अभियंता, रत्नागिरी नगर परिषद, जिल्हा कक्षातील सल्लागार/ तज्ञ उपस्थित होते.