चिपळूण: शहरातील खेंड येथील धवल मार्टमध्ये काम करणाऱ्या एका महिलेसह तीन कर्मचाऱ्यांनी संगनमताने एक लाख ६५ हजार रुपयांच्या मालाची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. याबाबत येथील पोलिस ठाण्यात तक्रार केली असून, याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
आरबाज दळवी (गुहागरनाका, चिपळूण), आदनान मोटलेकर (रा. धामणदेवी, चिपळूण) व शहरातील भोगाळे येथील एका महिलेवर (नाव माहिती नाही.) गुन्हा दाखल झाला आहे. या तिघांनी १ ते ३१ मे दरम्यान सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत धवल मार्ट या मॉलमध्ये संगनमताने मालाची चोरी केली. या तिघांनी धवल मार्टमधील सेन्सर मॅटिक सिस्टिमची यंत्रणा बंद करून एक लाख ६५ हजार ७९३ रुपयांच्या मालाची अफरातफर केली. त्यानुसार या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या चोरीचा तपास चिपळूण पोलिसांनी तत्काळ सुरू केला आहे.