खेड (वार्ताहर) : तालुक्यातील मुळगाव व तळघर येथील जांभा खाणीत महावितरणची वीज चोरून वापरल्याचा प्रकार महावितरणच्या भरारी पथकाने उघड केला. यामध्ये तब्बल २६ लाख २४ हजार २३० रुपयाची वीजचोरी केल्याप्रकरणी तिघांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार फेब्रुवारी २०२३ ते मार्च २०२४ चे मुदतीत मुळगाव, तळघर येथे घडला होता. याप्रकरणी विजय राजेश धरमसारे (उप-कार्यकारी अभियंता) भरारी पथक पेण, यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार रामचंद्र भागुजी बुदर, सचिन रामचंद्र बुदर व राकेश बुदर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी त्यांच्या मालकीच्या चिरेखाणीच्या वीज पुरवठ्यासाठी वापरण्यात येणार्या वीज संचाची सील तोडुन व पी. टी. चे स्क्रू ढिले करुन अनधिकृतपणे वीजेची चोरी करुन वापर करुन १४ महिन्यापासुन फेब्रुवारी २०२३ ते मार्च २०२४) या कालावधीत ८६२४६ युनिट्स विज चोरुन वापरली व त्याबाबतची १२,८९,८४०/- रुपयाची वीज चोरी केल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तळघरमध्ये देखील ७६०९४ युनिट्स विज चोरुन वापरून १३ लाख ३४ हजार ३९० रुपयांचे महावितरण कंपनीचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.