शाळा दुरुस्तीसाठी आवश्यक १६ कोटी, हाती केवळ ६ कोटी 

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळांची घंटा १५ जूनला वाजणार असला तरी किती शाळा दुरुस्तीला झाल्या आहेत, याचा आढावा घेण्याचे काम शिक्षण विभागाकडून सुरू आहे. मार्च महिन्यापासून लोकसभेची आचारसंहिता असल्याने निधी खर्च करताना जि. प. ला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. ४७९ शाळांची दुरुस्ती होणे अपेक्षित आहे, तसा आराखडा तयार करण्यात आला होता. या अंतर्गत १६ कोटींची मागणी केली होती, पण केवळ ६ कोटीच आल्याने खासगी शाळांच्या स्पर्धेत जि. प. ला भौतिक सुविधा देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यानुसार प्रयत्न सुद्धा करण्यात येत आहेत.

मात्र वर्गखोल्यांची दुरुस्ती करताना निधी फारच थोडा मिळतो. येथे सुद्धा शिक्षण विभागाला तारेवरची कसरतच करावी लागत आहे. सन २०२३-२४ च्या आराखड्यानुसार ४७९ शाळांच्या वर्गखोल्यांची दुरुस्ती होणे अपेक्षित होते. यासाठी १६ कोटी अपेक्षित होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने शासनाकडे मागणीसुद्धा केली. परंतू शासनाने अवघे ६ कोटी रुपये दिले. यामुळे अजूनही अनेक शाळा दुरूस्ती करणे बाकी आहेत. असे असले तरी गेल्या महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीमुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. कारण अनेक मराठी शाळांना मतदान केंद्र असल्याने त्यांची दुरुस्तीसुद्धा करण्यात आली आहे. यामुळे काही शाळा या निवडणुकीनिमित्त का होईना, दुरुस्त झाल्या आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी जि. प. प्रशासनाने सर्व तालुक्यांकडे शाळा दुरुस्तीचा आढावा मागितला असून, या नंतरच यावर्षीचा किती शाळा दुरुस्ती करायच्या आहेत, याचा नेमका आकडा समजणार आहे.