रत्नागिरी:- रत्नागिरी शहराचे उपनगर म्हणून ओळख बनत असलेल्या कुवारबाव ग्रामपंचायतीच्या कचरा प्रकल्पाला अद्याप मार्ग सापडलेला नाही. जिल्हाधिकार्यांकडे घनकचरा निर्मुलन प्रकल्पासाठी जागा मागूनही हा प्रस्ताव सध्या लालफितीच्या कारभारात अडकला आहे. ग्रामपंचायतीला जागा न देण्यामागे झारीतील शुक्राचार्य नेमके कोण असा प्रश्न आता ग्रामस्थ उपस्थित करु लागले आहेत.
रत्नागिरी शहरालगत असणार्या कुवारबाव ग्रामपंचायत परिसर हा रत्नागिरी रेल्वेस्थानकाला लागून आहे. या ग्रामपंचायतीच्या हद्दीतून मिर्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गही जात असल्याने, कुवारबाव हद्दीत मोठी बाजारपेठही तयार झाली आहे. याठिकाणी सध्या उपनगर तयार झाले असून, नवनवीन इमारतीही उभ्या रहात आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या कचर्याचा प्रश्न डोके वर काढत आहेत. ग्रामस्थ कोपर्याकोपर्यांवर कचरा टाकत आहेत. विशेषत: व्यापारी किंवा नवीन इमारतींमधील रहिवासी आजूबाजूला कचरा टाकत आहेत. अगदी कचरा टाकू नये असे बोर्ड लावलेले असतानाही, बोर्ड खालीच कचर्याचा ढिग तयार होत असल्याचे दृश्य आहे.
कुवारबाव ग्रामपंचायतीसाठी घन कचरा प्रकल्पासाठी जागा मिळावी यासाठी गतवर्षी 23 मार्च 2023 रोजी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव सादर केला होता. परंतु या प्रस्तावाकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. स्थानिक व्यापारी व व्यावसायिक कचरा कुवारबावच्या नागरी वस्तीत टाकत आहेत. त्यासाठी घनकचरा प्रकल्प उभारुन घंटागाडीद्वारे कचरा उचलावा, अशी मागणीही ग्रामस्थांमधून होत आहे.