केबल चोरी प्रकरणातून पुराव्याअभावी दोघांची निर्दोष मुक्तता

रत्नागिरी:- भारत संचार निगम लिमिटेडची कोळंबे ता. रत्नागिरी येथून चोरीस गेलेली केबल पोलिसांनी जप्त करून दोघा तरुणांना अटक केली. न्यायालयात चाललेल्या खटल्यात ओळख परेड नाही तसेच अन्य पुरावे त्रोटक आहेत. असे दिसून आल्याने दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

अभय अविनाश घडशी हे बिएसएनएल मध्ये नोकरीला आहेत. त्यांनी पोलीसात फिर्याद नोंदवली. त्यामध्ये नमूद केले की ४ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ९ वाजता कोळंबे येथील टेलिफोन टेक्निशिअन प्रमाकर आलीम हे परिसरातील लँडलाईन बंद असल्याबाबत पाहणी करण्याकरीता गेले होते. त्यांना कोळंबे बागवाडी पुलावर ६५ व ७२ मीटर केबल कोणतरी चोरून नेल्याचे दिसून आले. म्हणून फिर्याद दाखल करण्यात आली. हे प्रकरण मुख्य न्यायदंडाधिकारी रा. म. चौत्रे यांच्या समोर चालले. न्यायालयीन निर्णयात नमूद करण्यात आले आहे की, साक्षीदारांनी दोन तरुणांनी पळून जातान पाहिले, परंतू त्या तरुणांची अटकेनंतर ओळख परेड घेण्यात आली नाही. चोरीस गेलेली केबल आणि जप्त झालेली केबल ही तिच आहे हे सिद्ध करणारे पुरावेही न्यायालयासमोर टिकले नाहीत. म्हणून न्यायालयाने चोरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या दोघांना निर्दोष सोडले.