गणेशगुळे मंदिरातील दानपेटी अज्ञाताने फोडली

रत्नागिरी:- तालुक्यातील पावस परिसरातील मेर्वी गुरववाडी येथे एक कुलुपबंद घर फोडून चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना ताजी असताना गणेशगुळे गणपती मंदिरातील दानपेटीही फोडण्यात आली. त्या दानपेटीतून सुमारे ५ हजारांची रक्कम चोरीस गेल्याची तक्रार पूर्णगड पोलिसांत दाखल झाली आहे.

याविषयी पूर्णगड पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, हा प्रकार मंगळवारी सकाळी तेथील पूजाऱ्यांच्या निदर्शनास आला. चोरट्याने मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कमेवर डल्ला मारला होता. याविषयी खबर पूर्णगड पोलिसांकडे देण्यात आली. मेर्वी गुरववाडी येथे ३ दिवसांपूर्वी एक बंद घर फोडण्याची घटना घडली होती. त्यामुळे या परिसरात चोरटे सक्रिय असल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत.