२८ एप्रिल रोजी झालेल्या अपघातात दोघांनी गमावला होता जीव
लांजा:- एप्रिल महिन्याच्या अखेरीस आसगे दाभोळे राज्य मार्गावरील ‘हिट अँड रन’च्या घटनेत लांजा गोविळ जाधववाडी श्याम अर्जुन जाधव (५०) आणि प्रकाश साबाजी जाधव (५५) या दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पसार असलेला सोळा टायर ट्रक चालक रुपेश सिद्धू वाघमारे (वय-३५, रा. येळापूर, ता. शिराळा, जि. सांगली) याला अपघातातील सोळा टायर ट्रकसह पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. ३१ मे रोजी त्याला सांगली येथून अटक करून लांजा दिवाणी न्यायालयासमोर हजर केले असता त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे या गुन्ह्याची उकल करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, २८ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता साखरपुड्याच्या कार्यक्रमास जात असताना आसगे येथे एका वळणावर लांजा- कोर्ले थिठा येथून दाभोळे येथे जाणाऱ्या एका वाहनाने जाधव बंधुंच्या दुचाकीला धडक दिली होती. यात दोघांचाही मृत्यू झाला होता. मात्र त्यांना धडक देणाऱ्या वाहनधारकाने तेथून पोबारा केला होता. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी लांजा कोर्ले फाटा, धुंदरे लाकूड गिरण, आसगे येथील कोत्रे दुकान या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही लांजा ‘हिट अँड रन’ प्रकरणातील चालक सांगलीतील कॅमेऱ्यांचा आधार घेतला. त्यानंतर लांजा पोलिसांनी तातडीने दखल घेऊन तपासचक्रे वेगाने फिरवून ३१ मे रोजी सांगली येथून रुपेश वाघमारे (रा. येळापूर, ता.शिराळा, जि. सांगली) याला अटक केली. तसेच अविनाश काबदुले (राहणार सांगली) यांच्या मालकीचा (एमएच. ५० एन ८१७२) हा सोळा टायर ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला होता.
आसगे येथील चौधरी यांच्या हार्डवेअर सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली. याप्रकरणी चालकावर मोटारवाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ आणि भा.दं.वि कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत अधिक तपास लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकड़े करीत आहेत.