महामार्गावर गर्डरवर दुचाकी आदळून अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरच्या खेरशेत येथील टोल नाक्याठिकाणी ठेवण्यात आलेल्या गर्डरवर दुचाकी आदळून गंभीररित्या जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री घडली. महामार्गावर ठेवण्यात आलेले धोकादायक गर्डरवर यापूर्वी देखील दुचाकीस्वार आदळल्याची घटना घडली आहे. अनिल रामचंद्र घाडगे (30, खेरशेत-पुनर्वसन) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनिल घाडगे हा शनिवारी रात्री 9.30 ते 10 वाजण्याच्या सुमारास आरवलीहून खेरशेत येथे घरी येत होता.

मुंबई-गोवा महामार्गावरुन दुचाकीने प्रवास करत असताना तो खेरशेत येथील टोल नाक्याठिकाणी आला. त्याठिकाणी महामार्गाच्या ठेकेदाराने भलेमोठे गर्डर ठेवले असून गर्डरठिकाणी अंधार असल्याने याच गर्डरवर अनिल याची दुचाकी जोरदारपणे आदळली. या अपघातात अनिल याच्या डोक्याला गंभीररित्या दुखापत झाली. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारकाच्या हा अपघाताचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याची कल्पना ग्रामस्थांना दिल्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली. मात्र गंभीररित्या जखमी झालेल्या अनिलचा यातच मृत्यू झाला आहे. अनिल हा छोटी- मोठी कामे करुन आपले घरकुटूंब चालवत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले आई-वडील आहेत.