महावितरणची मान्सूनपुर्व कामांची लगबल सुरु

रत्नागिरी:- पावसाळ्यामध्ये महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा, याकरीता मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार मार्गदर्शक सूचनेनुसार पावसाळ्यात वीज पुरवठ्यातील बिघाड कमीतकमी होईल या दृष्टीने नियोजन करून मान्सूनपूर्व विद्युत यंत्रणा देखभाल दुरुस्तीची कामे रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात आलेली आहेत.

महावितरणने लघु व उच्चदाब वीज वाहिन्यांच्या ५४५० गाळ्यातील वीज तारांना स्पर्श करणार्‍या झाडांच्या फांद्या छाटल्या आहेत. २३० खराब वा गंजलेले वीज खांब बदलले आहेत. ३२३ लघु व उच्चदाब वीज वाहिन्या गाळ्यातील सैल वीजतारा ओढल्या. ५ किलोमीटर लांबीच्या जीर्ण वीजतारा बदलल्या. ९५० मीटर नादुरूस्त सर्व्हिस वायर बदलल्या. २६ ठिकाणी लघु व उच्चदाब वीजवाहिन्या गाळ्यांना गार्डींग बसविले. १०२ पीव्हीसी स्पेसर्स लघुदाब वीज वाहिनीत बसविले. १६१ ठिकाणी जंपर बदलले. २१५ पिन, ७० डिस्क व ४५ स्टे इन्सुलेटर बदलले. ४५ खराब रोहित्र पेट्या बदलल्या. महावितरणकडून प्राधान्यक्रमानुसार वीज वाहिन्यांची व वीज उपकरणांची देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत.

रस्त्यालगतच्या व रस्ता क्रॉस करणार्‍या वाहिन्यांच्या गार्डींगची तपासणी करणे व त्याचा योग्य तो ताण ठेवणे. उच्चदाब व लघुदाब खांबाचे पुर्ण आर्थिंग तपासणे तसेच आवश्यक असल्यास दुरुस्ती करणे. वितरण रोहित्रांचे पुर्ण आर्थिंग तपासणे आणि तुटलेल्या अर्थवायर पुर्ववत करणे. रोहित्र वितरण पेटींची जळालेली केबल बदली करणे, रोहित्र वितरण पेटीस आर्थिंग करणे. रोहित्राच्या तेलाची गळती थांबविणे. रोहित्राच्या सिलीका जेल बदली करणे.रोहित्र व वाहिन्यांचे खराब झालेले लाईटनिंग अरेस्टर बदली करणे. उपकेंद्रांची आर्थिंग तपासणी करणे. उपकेंद्रांमधील वाढलेले गवत काढणे व स्वच्छता करणे. उपकेंद्रांतील लाइटिंग अरेस्टरची तपासणी करणे व नादुरुस्त असल्यास नवीन लावणे.उपकेंद्रांतील बॅटरींची स्थिती तपासणी करणे व मेंटेनन्स करणे. उपकेंद्रातील आयसोलेटर अलाइनमेंट तपासणे व दुरुस्त करणे.

आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व सामुग्री आणि उपकरणांचा साठा जसे की, रोहित्र ऑईल, वीज खांब, इन्सुलेटर इ. उपलब्ध ठेवण्यात आला आहे. पावसाळ्यामध्ये वीज पुरवठा सुरळीत सुरु राहण्याकरीता क्षेत्रिय अधिकारी व कर्मचार्‍यांना दक्ष राहणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.