फिनोलेक्स कॉलनीजवळ डोंगराचा भराव महामार्गावर आल्याने वाहतूक ठप्प

रत्नागिरी:- मिऱ्या नागपूर महामार्गाचे काम सुरू असताना रत्नागिरीतील फिनोलेक्स कॉलनी जवळ वळण काढण्यासाठी कापलेल्या डोंगराचा भराव पहिल्याच पावसाळ्यात रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यानंतर ठेकेदारांच्या जेसीबीने रस्त्यावर आलेला भराव बाजूला करण्यात आला.

मुंबई गोवा महामार्ग प्रमाणेच मिऱ्या नागपूर महामार्गाचे काम रत्नागिरीतील मिऱ्या गावापासून सुरू आहे. उद्यमनगर येथील फिनोलेक्स कॉलनी जवळील मोठे वळण काढण्यासाठी समोरचा डोंगर कापण्यात आला आहे. डोंगरातील काढलेला भराव पहिल्याच मुसळधार पावसामुळे मुख्य रस्ता आल्यामुळे रत्नागिरीतून गणपतीपुळेकडे जाणारा मार्ग काही काळ ठप्प झाला. त्यानंतर ठेकेदाराने आपल्या मशनरी पाठवून हा मार्ग मोकळा करण्याचे काम रात्री सुरू केले होते. त्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. परंतु डोंगर कापल्यामुळे भरावाचा चिखल रस्त्यावर आल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.