जिल्हा परिषदेचे घरपट्टी, पाणीपट्टीपोटी 16 कोटी थकीत

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीकडून केलेली घरपट्टी व पाणीपट्टी वसुली यंदा कमी झाल्याचे दिसत आहे. पाणीपट्टी 85 टक्के तर घरपट्टीची 77 टक्के वसुली झाली आहे. घरपट्टीचे 12 कोटी 79 लाख 76 हजार तर पाणीपट्टीचे 3 कोटी 54 लाख 36 हजार रुपये थकीत राहिले आहेत.

सर्वाधिक कमी वसुली ही गुहागर तालुक्यात झाली आहे. घरपट्टी तर फक्त 33 टक्केच आहे.
जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागांतर्गत विविध योजना, ग्रामपंचायत स्तरावरून राबविण्यात येत असतात. या मुख्य म्हणजे पाणीपुरवठा योजना, घरकुल योजनांचा अधिक भर असतो. गावात पाणीपुरवठा केल्यानंतर गावात कर वसुली ग्रामपंचायतींना करावी लागत असते. या करवसुलीतून मिळणार्‍या रकमेतून योजनावरील वीजबिल देयके, दुरुस्ती केली जाते

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमार्फत गावपातळीवर आपापल्या कार्यक्षेत्रातील कुटुंबांकडून घरपट्टी, पाणीपट्टी कराची वसुली करण्यात येते. यानुसार दरवर्षी मार्च अखेरपर्यंत जास्तीत जास्त कर वसुल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. ग्रामपंचायत, तालुका व जिल्ह्याचा विकास व्हायचा असेल तर सरकारकडून मिळणार्‍या निधीवर विसंबून न राहता घरपट्टी आणि पाणीपट्टी यांच्यातून विकास साधण्याचे गरजेचे आहे. प्रत्येक गावांतील नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसुली केली जाते. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी घरपट्टी व पाणीपट्टी कोट्यवधीच्या घरात शिल्लक राहिली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गोळा होणारा हा महसूल अनेक विकासकामांवर परिणाम करणारा ठरत आहे.
यावर्षी घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे सर्वाधिक कमी वसुलीचे प्रमाण गुहागर व खेड तालुक्यात दिसत आहे. घरपट्टीमध्ये गुहागर तालुक्याने अवघे 33.87 टक्के वसुली केल्याने जिल्ह्याचा वसुलीचा टक्का घसरला आहे. त्याचबरोबर खेड तालुक्याने 70 टक्के वसुली दिली आहे. उर्वरीत तालुक्याने मात्र 90 टक्केच्या पुढे वसुली आहे. यावर्षी पाणीपट्टी मात्र बर्‍यापैकी वसुली झाली आहे. पाणीपट्टी 85.27 टक्के इतकी झाली आहे. यामध्ये खेड तालुक्यात सर्वाधिक कमी वसुली आहे.