कुटुंब नियोजनाच्या जबाबदारीतही ‘लेडीज फर्स्ट’च

चार वर्षात केवळ १८ पुरुषांकडून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया

रत्नागिरी:- वाढती लोकसंख्या, वाढती महागाई आणि मर्यादित साधनसामग्री यामुळे एकत्र कुटुंबपद्धती आता नामशेष होताना दिसत आहे. यातून विभक्त कुटुंब पद्धती आणि त्याचबरोबरच ‘हम दो, हमारे दो’ पाठोपाठ ‘हम दो हमारा एक’ अशा संकल्पनाचाही अनेक कुटुंबांनी स्वीकार केला आहे. त्यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे यात ‘लेडीज फर्स्ट’ दिसत आहेत. गेल्या चार वर्षांत आरोग्य विभागाने तब्बल 11 हजार 753 महिलांवर कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या असून, शस्त्रक्रिया करणार्‍या पुरुषांची संख्या या चार वर्षांत अवघी 18 आहे.

वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाकडून कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती केली जात आहे. याशिवाय पाळणा लांबविण्यासाठी तांबी, गर्भनिरोधक गोळ्या आणि अंतरा हे इंजेक्शनही उपलब्ध केलेले आहे. काही ठिकाणी एकाच मुलावर शस्त्रक्रिया केली जाते, तर काही ठिकाणी वंशाला दिवा हवा असल्याने अक्षरशः चार अपत्यांनंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून घेणार्‍या महिलांची संख्याही जास्त आहे. अर्थात, शासनाने या शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले असून, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच आरोग्य केंद्रांमध्ये ऑपरेशन थिएटर असलेल्या ठिकाणी ही शस्त्रक्रिया केली जात आहे.

त्यासाठी प्रोत्साहनपर आर्थिक मदत दिली जाते. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे दर वर्षीचे शस्त्रक्रिया उद्दिष्ट गाठण्यासाठी मोठी जनजागृती केल्याचेही दिसले आहे. कुटुंब नियोजनात महिलाच पुढे आलेल्या आहेत. याउलट पुरुषांनी कुटुंब
नियोजन शस्त्रक्रियेकडे पाठ फिरवल्याचे
पाहायला मिळाले आहे. वर्षभरात सुमारे 4 हजार 382 महिलांनी शस्त्रक्रिया करून घेतल्या असून, अवघ्या 5 पुरुषांनी नसबंदीची शस्त्रक्रिया केल्याचे समोर आले आहे.