मार्केटिंग कंपनीकडून वृद्धाची दोन लाखांची फसवणूक

चिपळूण:- तालुक्यातील पालवण कोष्टेवाडी येथील ६६ वर्षीय वृद्धाची मार्केटिंग कंपनीने सुमारे दोन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार ५ ते ७ मे या कालावधीत घडला. याप्रकरणी एका तरुणावर गुरुवारी चिपळूण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

प्रीतम चंद्रकांत उकार्डे (२५, रा. चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पालवण कोष्टेवाडी येथील सीताराम शंकर पाणिद्रे यांनी फिर्यादी दिली आहे. प्रीतम उकार्डे या तरुणाने पाणिंद्रे यांना इस्टोअर वेदीकोअर कंपनीत पैसे गुंतविल्यास तुम्हाला इस्टोअरमध्ये भुसार सामानाची खरेदी केल्यास १० टक्के सूट मिळेल व कंपनीत गुंतवलेल्या २२ आयडीवर प्रत्येक महिना एकूण ८ हजार ९९१ रुपये एवढे ३६ महिने रक्कम मिळत राहतील, असे सांगून पाणिद्रे यांची दिशाभूल केली.

तसेच त्यांच्या नावे एकूण २२ आयडी तयार करून त्यांच्या अँक्सिस बँक खात्यातून १ लाख ९८ हजार २८० रुपये एवढी रक्कम ५ ते ७ मे या कालावधीत वेदुक्यअर या कंपनीच्या खात्यावर वळवून घेतली. मात्र, त्यानंतर अद्याप पैसे परत केलेले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सीताराम पाणिद्रे यांनी पोलिस स्थानक गाठले.