लांजाः– जमिनीच्या वादातून तसेच कौटुंबिक वादातून तिघांनी केलेल्या हल्ल्यात चौघेजण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील कोंडगे बेलाची वाडी येथे २ जून रोजी घडली आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंडगे येथील चव्हाण कुटुंबीयांमध्ये गेल्या काही वर्षांपासून जमीन जागा तसेच कौटुंबिक कारणावरून वाद सुरू आहेत. या घटनेबाबत कोंडगे बारस्करवाडी येथील सायली यशवंत चव्हाण (२४) हीने दिलेल्या फिर्यादी नुसार २ जून रोजी सायंकाळी ६.२० वाजता सायली चव्हाण ही आपली बहीण मंदा सुहास तेली (२६) या दोघी शेजारच्या घरातून पायवाटेने घरी येत असताना संतोष पांडुरंग चव्हाण (राहणार कोंडगे बेलाचीवाडी) याच्या घराजवळ आले असता संतोष चव्हाण यांने मंदा हिला पाहून तुला नवऱ्याने सोडली म्हणून तू इथे राहिलीस असे बोलला. म्हणून मंदा हीने संतोष चव्हाण यांना तू असे का बोललास मी तुझे काय केले आहे. मी तुझ्या दारात उभी आहे का? माझ्या नवऱ्याने तुझ्या दरवाजात आणून सोडले आहे का? असे विचारणा केली. याचा राग आल्याने संतोष चव्हाण याने मंदा हिला शिवीगाळ करून ठार मारण्यासाठी अंगावर धावत गेला व तिचा गाऊन एका हाताने पकडून दुसऱ्या हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्या दोघींचा ओरडल्याचा आवाज ऐकून संतोष याची पत्नी सलोनी पुढे येऊन तिने पती संतोषला ढकलून दिले.
यावेळी संतोष चव्हाण याचा सासऱ्याने तिथे असलेला लाकडी दांडा त्याच्या हातात दिला. तो संतोष याने मंदा हिच्या डोक्यात मारुन दुखापत केली. त्यावेळी त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून मंदा व सायली यांचे आई वडील आले. यावेळी प्रशांत चव्हाण याने सायली चव्हाण हिचे आई सुनिता यशवंत चव्हाण (वय ५४) हिला हाताने मारहाण करून धक्काबुक्की केली. तर वडील यशवंत चव्हाण (वय ५५) यांच्या पोटावर दगड फेकून मारून दुखापत केली. तसेच त्या झालेल्या मारहाण आणि झटापटीमध्ये मंदा तेली हिचा गाऊन फाटून गळ्यातील मंगळसूत्र तुटले.
या घटनेत चौघांना मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी संतोष पांडुरंग चव्हाण (कोंडगे, बेलाची वाडी), प्रशांत पांडुरंग चव्हाण (कोंडगे बेलाची वाडी ) आणि संतोष याचा सासरा अशा तिघांवर भा.द.वि कलम ३२४, ३२३, ५०४, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून यबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश आखाडे हे करत आहेत