बंदी कालावधीत बिगरयांत्रिकी मासेमारी नौकांना मासेमारीची मुभा

रत्नागिरी:- पावसाळी मासेमारी बंदी कालावधी 1 जूनपासून सुरू झाली असली तरी बिगरयांत्रिकी मासेमारी नौकांना या बंदीकाळात मासेमारी करण्याची मुभा आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 446 बिगरयांत्रिकी नौका असून 1 जून ते 31 जुलैपर्यंतच्या बंदी कालावधीत या नौका मासेमारी करताना दिसून येणार आहेत. या मासेमारी नौका बंदीकाळात समुद्रात तडीवर मासेमारी करतात.
रत्नागिरी जिल्ह्याला 167 कि.मी.चा समुद्र किनारा लाभला असून 2 हजार 520 सागरी मासेमारी नौका आहेत. यातील 2 हजार 74 यांत्रिकी नौका असून त्यामध्ये सुमारे 280 पर्ससीन नेट नौका आहेत.

पावसाळी मासेमारी बंदी कालावधी शनिवारपासून सुरू झाला असला तरी पर्ससीन नेट नौका 10 मे रोजीच बंदरावरील जेटींवर उभ्या करण्यात आल्या आहेत. इतर नौकांची मासेमारी 1 ऑगस्टपासून सुरू होणार असली तरी पर्ससीन नेट नौकांची मासेमारी दरवर्षी 1 सप्टेंंबरपासून सुरू होते.
पावसाळी बंदी कालावधीत मासेमारी बंद ठेवण्याची बिगर यांत्रिकी नौकांवर सक्ती नसते. किनार्‍यालगत तडीवर या बिगरयांत्रिकी नौका मासेमारी करत असतात. त्यामुळे ज्यावेळी पावसाळ्यात वातावरण धोकादायक असते तेव्हा मात्र बिगर यांत्रिकी नौकासुद्धा समुद्रात मासेमारीसाठी नेल्या जात नाहीत.