रत्नागिरी पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब मायंगडे यांचे निधन

जाकादेवी:- रत्नागिरी तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती, तरवळ गावचे माजी सरपंच, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कुशल नेतृत्व, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण उर्फ बाळासाहेब देमाजी मायंगडे यांचे रविवार दि. २ जून रोजी सकाळी वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.

बाळकृष्ण उर्फ बाळासाहेब मायंगडे हे जुनी चौथीपर्यंत शिकलेले होते. गावचे सरपंच ते रत्नागिरी तालुका पंचायत समितीचे उपसभापती अशी त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. गावातील सामाजिक सलोखा राखण्यात ते अग्रस्थानी असत. आपल्या पदाचा वापर त्यांनी लोकोपयोगी कामांसाठी प्रामाणिकपणे केला. शैक्षणिक सामाजिक धार्मिक क्षेत्राची त्यांना प्रचंड आवड होती.आपल्या सामाजिक व राजकीय पदाचा वापर त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात विविध मूलभूत विकासकामांसाठी केला.जनमानसात जाणकार आणि प्रभावी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या कतृर्त्वाने नावलौकिक मिळविला.