रत्नागिरी:– अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या राहुल भिकाजी तांबे याचा जामीन अर्ज येथील विशेष न्यायालयाने फेटाळून लावला.
देवरुख पोलीस स्थानकात राहुल तांबे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. इन्स्टाग्रामवरुन राहुल व मुलीची ओळख झाली होती. त्यांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिले होते. त्यानंतर त्यांचे बोलणे सुरु झाले होते. पुतणीच्या बारशाला आपण जाऊया असे आरोपीने सांगितले. हा कार्यक्रम देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथे होता. मुलीच्या काकुने देवगडला जाण्यासाठी तिला परवानगी नाकारली. म्हणून तीने शाळेत जाते असे सांगून ती देवरुख स्टॅंडवर आली. तीने आरोपी राहुल याला फोन केला. ती बारशाला येत असल्याबाबत कळवले. राजापूर येथे घ्यायला ये असे आरोपीला तीने सांगितले. राजापुरला पोहचल्यावर फोन केला. आरोपीने मोटारसायकलवरून येत असल्याबद्दल तिला सांगितले. आरोपी तेथे पोहोचल्यानंतर फोटोग्राफवरुन त्यांनी एकमेकांना ओळखले.
यानंतर ते दोघे देवगड येथे गेले. रात्री जेवण झाल्यावर ते दोघे तेथेच राहीले. पिडीत मुलगी १५ वर्ष ६ महिने वयाची तर आरोपी दुप्पट वयाचा असल्याचे कथन न्यायालयात करण्यात आल्याचे निकालपत्रात नमुद करण्यात आले आहे. हे प्रकरण विशेष न्यायाधीश एस.एस. गोसावी यांच्या समोर सुनावणीस आले. बारशाचा कार्यक्रम रात्री उशीरापर्यंत पार पडला. त्यामूळे मुलीनेच राहण्याचा आग्रह धरला. कोणतीही जबरदस्ती झाल्याचे पुरावे नाहीत. सरकारी वकीलांनी सांगितले की लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आले. न्यायालयाने आपल्या निकालपत्रात नमुद केले की अज्ञान मुलीची संमत्ती ही महत्वाची नाही. आरोपी हा दबाव आणण्याची शक्यता असल्याने जामीन मंजूर करता येण्या जोगा नाही. असे नमुद करुन जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला.