संकष्टीला गणपतीपुळे ३५ हजार भाविकांची हजेरी

हंगामातील सर्वाधिक गर्दी ; कोटीच्या घरात उलाढाल

रत्नागिरी:-तालुक्यातील सुप्रसिद्ध श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे संकष्टी चतुर्थीनिमित्ताने भाविकांची अभूतपूर्व गर्दी झाली होती. रविवारी शासकिय सुट्टी असल्यामुळे पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांना श्रींच्या दर्शनासाठी रांगा लावल्या. दिवसभरात ३५ हजाराहून अधिक भाविक श्रींच्या दर्शनासाठी हजेरी लावून गेले. यंदाच्या हंगामातील ही सर्वाधिक गर्दी असल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले. दर्शन रांगांमध्ये कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी गणपतीपुळे देवस्थानकडून व्यवस्था करण्यात आली होती.

लोकसभा निवडणुका, उन्हाचा कडाका या कारणांमुळे कोकणातील पर्यटनस्थळांना पर्यटकांची प्रतिक्षा होती. निवडणुकीचे टप्पे पुर्ण होत गेले, तसे रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर गर्दी होऊ लागली. त्यामध्ये पावसाचा अडथळा वाटत होता. पण त्यावर मात करत पर्यटक दाखल झाले. जोडून आलेल्या शासकिय सुट्ट्या आणि रविवारीची संकष्टी चतुर्थी याचा फायद मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांनी घेतला. त्यामुळे कालपासूनच गणपतीपुळेमध्ये प्रचंड गर्दी होती. यंदाचा पर्यटन हंगाम लांबल्यामुळे चिंतेत पडलेल्या व्यावसायिकांना गणपतीपुळ्याचा गणपती पावला आहे. आज पहाटेपासूनच श्रींच्या मंदिरातील सहा दर्शन रांगा आणि बाहेरील चार रांगांमध्ये भावीकांची गर्दी होती. मागील आठवड्यात दरदिवशी साधारण १५ हजारापर्यंत पर्यटक गणपतीपुळेत येऊन जात होते. शनिवार, रविवारी यामध्ये वाढ होत होती. मात्र आज संकष्टीच्या दिवशी विक्रमी ३५ हजार लोकांनी गणपतीपुळ्यात श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनानंतर पर्यटक किनाऱ्यावर फिरण्याचा आनंद घेत होते. त्यामुळे किनाऱ्यावरील व्यावसायीकांना दिलासा मिळाला. परजिल्ह्यातून आलेले पर्यटक गणपतीपुळेत राहीले होते. त्यामुळे लाॅजींगवाल्यांना त्याचा फायदा झाला. काही लोकांना मालगुंडसह आजुबाजूच्या ठिकाणी राहण्यासाठी व्यवस्था करावी लागली. तर काही पर्यटक रत्नागिरी राहीले. वाढलेल्या पर्यटकांमुळे आज दिवसभरात एक कोटीच्या घरात उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. खासगी वाहनांची गर्दी अधिक असल्यामुळे वारंवार कोंडी होत होती. पण पोलीस प्रशासह सतर्क होते. जलयानाना बंदी घातल्यामुळे त्या व्यावसायीकांचा हिरेमोड झाला. तसेच पर्यटकही थांबलेले नाहीत. दरम्यान, पश्चिम बंगालमधील वादळामुळे समुद्र खवळलेला होता. तरीही पर्यटक बिनधास्तपणे समुद्रात उड्या घेत होते. त्यांच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायत, देवस्थानकडून जीवरक्षक नेमण्यात आले होते. पोलीसही सुरक्षेसाठी तिथे उपस्थित होते.