जिल्हा परिषदेच्या शाळांचा हायटेक शाळांच्या धर्तीवर विकास

१३ शाळांची निवड; २४ कोटी ४४ लाखांचा निधी

रत्नागिरी:- केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळा गुणवत्ता आणि भौतिक सुविधेतही सर्वोत्कृष्ट व्हाव्यात. यासाठी केंद्र सरकारने उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या शाळा ‘हायटेक शाळा’ म्हणून विकसित करण्यास सुरुवात केली आहे. या योजनेत जिल्ह्यातील १३ शाळांचा समावेश असून, त्या शाळांवर २४ कोटी ४४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी व भविष्यात विद्यार्थ्यांना पाठदुखीचा त्रास होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषद विभागप्रमुखांनी शाळेत भेट देत विद्यार्थ्यांशी हितगुज साधायला सुरुवात केली. तसेच पाठ्यपुस्तक व दप्तरातील साहित्याच्या पलीकडे जाऊन त्यांना शाळेत, शाळेच्या परिसरातील उपलब्ध साधन सामुग्रीमधूनही विविध विषयांतील ज्ञान अवगत करता यावे, याकरिता दप्तराचे ओझे कमी करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १३ शाळा ‘हायटेक’ करण्यात येणार आहेत.

या योजनेंतर्गत प्रत्येक शाळेला त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी १ कोटी ८८ लाख इतका निधी देण्यात येणार आहे. हा निधी ५ वर्षात खर्च करायचा असून, शासनाने हा निधी देण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील १३ शाळांना ६७ लाख ८९ हजार रुपयांचे वाटपही करण्यात आले आहे.
यामध्ये स्मार्ट क्लास, स्मार्ट शोध प्रयोगशाळा उभारण्यात येतील. मुलांसाठी आधुनिक संगणक लॅब राहणार आहे. मुलांच्या आवडीनुसार त्यांच्या गुणवत्ता वाढीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच या शाळांना आधुनिक तंत्रज्ञान, स्मार्ट शिक्षण, पहिली ते बारावीतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रयोगशाळेत निगराणीत ठेवून त्यांना सर्व गुण शिकविले जाणार आहेत. पुस्तकांबरोबरच प्रयोगशाळाही विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.


 • तेरा शाळांना अनुदान
 • चिपळूण जि. प. शाळा वहाळ ३ लाख ६२ हजार रूपये
 • दापोली जि. प. शाळा वाकवली ६ लाख ३१ हजार
 • गुहागर जि. प. वेळणेश्वर क्र.१ ७ लाख ७० हजार
 • खेड जि. प. भडगाव उसरेवाडी नं.१ ३ लाख २९ हजार
 • लांजा नं. १ ७ लाख ५२ हजार १००
 • मठ कडूवाडी ३ लाख २७ हजार
 • मंडणगड जि. प. वाल्मिकीनगर २ लाख ८१ हजार
 • राजापूर जि. प. पाचल क्र, ५ ६ लाख २९ हजार
 • राजापूर उर्दू ३ लाख ३१ हजार
 • रत्नागिरी जि. प. केंद्रशाळा झरेवाडी ४ लाख २८ हजार
 • र.न.प. शाळा क्र. १० मिरकरवाडा उर्दू ७ लाख ५१ हजार २००
 • संगमेश्वर जि. प. शाळा देवरूख नं. ४ ७ लाख ७७ हजार
 • कोंडगाव बुद्रुक साखरपा क्र.१ ४ लाख २० हजार