जाळी सुकविण्यासाठी मच्छीमारांची लगबग

हंगामाचे शेवटचे चार दिवस ; नेपाळी, कर्नाटकी खलाशी परतीच्या मार्गावर

रत्नागिरी:- बंगालच्या उपसागरात धडकलेले रेमुल वादळामुळे समुद्र खवळला असून मागील आठवड्यात कोकण किनारपट्टीवर वेगवान वाऱ्यासह पडलेल्या वळीवाच्या पावसाने शेवटच्या टप्प्यात मच्छीमारांना अपेक्षित उत्पादन मिळालेले नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या मच्छीमारांनी नौका बंदरात ओढण्यास सुरवात केली आहे. मच्छीमारी जाळी सुकविण्यास काढली आहेत.

रत्नागिरी शहराजवळील विस्तीर्ण अशा चंपक मैदानावर अनेक मच्छीमारांची जाळी पसरलेली आहेत. येत्या आठवड्यात खलाशी म्हणून आलेले नेपाळी, कर्नाटकी कामगार परतीच्या प्रवासाला लागणार असल्यामुळे एक आठवडा आधीच पॅकअप करावे लागले आहे. चार दिवसांनी मच्छीमारी हंगाम संपणार असला तरीही ८० टक्के नौका बंदरात स्थिरावल्या आहेत.

यंदा मच्छीमारांचा हंगाम यथातथाच गेला. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात जहाज-नौकांची डागडुजी करणे, जाळी सुकवून पुढच्या हंगामात वापरात येतील अशी तजवीज करणे यासाठी मच्छीमारांची तयारी सुरू झाली आहे. माशांचा प्रजननाचा कालावधी असल्यामुळे १ जूनपासून मच्छीमारी बंद होणार आहे. मासे मिळत नसल्यामुळे १० मे नंतर मच्छीमारांनी आवरते घेण्यास सुरवात केली. शेवटच्या आठवड्यात कोळंबी बऱ्यापैकी मिळत होती. त्यामधून थोडाफार फायदा मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र वळवाचा पाऊस आणि वादळीवाऱ्यांनी त्यावर पाणी फेरले. त्यानंतर ७० टक्केहून अधिक नौका मिरकरवाडा बंदरात स्थिरावल्या. नौकांच्या देखभालीसाठी वर्षानुवर्षे वापरण्यात येणारे साहित्य, नौकेवरील जेवणासाठीचा सिलेंडर, नौकांवरील अवजड जाळी सुरक्षित ठेवण्यासाठीचा आटापिटा सुरू झाला आहे. सुमारे ८० टक्के नौका बंदरात दाखल झाल्या आहेत. नौकांवरील जाळी, टेम्पो अथवा ट्रकमधून पर्ससिनेटची जाळी सुकविण्यासाठी रत्नागिरी शहराजवळील चंपक मैदानात आणली आहेत. गेले दोन दिवस चंपक मैदानात जाळीची वाहतूक सुरू आहे. मिरकरवाडा ते चंपक मैदान येथे रस्त्याच्या कामामुळे मोठ्या ट्रकमधून जाळी आणताना कसरत करावी लागत आहे. त्यासाठी दहा ते बारा माणसं चंपक मैदानात राबत आहेत. दिवसभर जाळी सुकल्यानंतर ती गुंडाळून मिरकरवाडा येथे आणली जात आहेत. फाटलेली जाळी जागेवरच दुरुस्त केली जात आहे. बंदरांवर उभ्या असलेल्या लाकडी बोटींच्या दुरुस्तीची कामेही सुरू आहेत. मिरकरवाडा, कर्ला, साखरतर, कासारवेली या शहरातील भागात या नौकांच्या डगडुजीचे कामही सुरू आहे.