आरजू कंपनीच्या तीनपैकी दोघा संचालकांना बेड्या

रत्नागिरी:- आरजू टेक्सोल कंपनीच्या तीन संशयित संचालकांपैकी दोघांना अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अन्य एक संचालक नजरेआड आहे. आजवर कंपनीच्या विरोधात ११५ जणांनी जबाब नोंदविला असून ही फसवणूक कोट्यवधीची आहे. आतापर्यंत सुमारे दीड कोटीची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

संजय गोविंद केळकर (वय ४९ वर्षे, रा. घर नं. ३५०, अथर्व हॉटेल शेजारी, तारवेवाडी-हातखंबा ता. जि. रत्नागिरी), प्रसाद शशिकांत फडके (वय ३४, वर्षे, रा. घर नं. ७२, ब्राम्हणवाडी, रामेश्वर मंदिराजवळ गावखडी, ता. जि. रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तर अन्य एक संशयित अजून सापडलेला नाही. आरजू टेक्सोल कंपनी विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन अधिक तपास रत्नागिरी पोलिस दलाची आर्थिक गुन्हे शाखा (Economic Offence Wing-EOW) यांच्याकडे दिला आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत दोघा संशयितांना अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेस यश आले आहे. या फसवणूक प्रकरणी आजवर 115 गुंतवणूकदारांचा जबाब नोंदविला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित केळकर यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३१ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मास्टर माईंड अनी जाधव फरार…

आरजू टेक्सोल कंपनीचा मुख्य सूत्रधार अनी जाधव आहे. पोलिस त्याच्या शोधात आहे. मात्र यातील संशयित प्रसाद फडके हा गुन्हा दाखल झाल्यापासून दिल्ली, जोधपूर असा फिरत होता. तो संगमेश्वरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली.

पोलिसांचे आवाहन

तक्रार नोंदवू इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांना कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत आर्थिक शाखेत भेट द्यावी. जबाब नोंदविण्यासाठी ज्या नागरिकांनी संबंधित कंपनीत गुंतवणूक केली आहे आणि ज्यांच्या तक्रारी नोंदवण्याची इच्छा आहे, अशा नागरिकांनी गुंतवणुकीसंदर्भातील पुरावे घेऊन यावे. टप्या-टप्याने संपर्क करून बोलावण्यात येईल. सर्व नागरिकांनी शांतता व संयम राखावा तसेच कार्यालयात अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन पोलिसानी केले आहे.

ज्यांची आरजू टेक्सोल कंपनीने, व्यक्तींकडून फसवणूक झाली आहे, त्या सर्वांच्या साक्षी नोंदविण्यात येतील. पोलिस दल प्रत्येक तक्रारीची काळजीपूर्वक हाताळणी करण्यासाठी कटिबद्ध आहे.

  • धनंजय कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, रत्नागिरी.