दहावीच्या निकालात पुन्हा कोकणची बाजी; कोकणातील ९९.०१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत कोकण विभागीय मंडळाचा निकाल ९९.०१ टक्के लागला असून राज्यात सलग अव्वल राहण्याचा मिळवला आहे. आज दुपारी ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आणि विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. गतवर्षी मंडळाचा निकाल ९८.११ टक्के लागला होता यंदा निकालात ०.९ टक्के वाढ झाली आहे. रत्नागिरीमध्ये परीक्षा केंद्रावर फक्त एकच गैरप्रकार घडला आहे.

परीक्षेस बसलेल्या एकूण २६७८० विद्यार्थ्यांपैकी २६५१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ४१९ शाळांसाठी ७३ परीक्षा केंद्रे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२९ शाळांसाठी ४१ अशी एकूण ६४८ शाळांसाठी ११४ परीक्षा केंद्र ठेवली होती. पुन्हा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात १२८ व सिंधुदुर्गमध्ये ४५ जण उत्तीर्ण झाले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात ९०१६ मुलगे व ८७७० मुली उत्तीर्ण झाल्या. तर सिंधुदुर्गमध्ये ४५३५ मुलगे व ४१९६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलग्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९८.६६ व मुलींची टक्केवारी ९९.३९ आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ०.७३ टक्के अधिक आहे. संस्कृत, अंकगणित, शरीरशास्त्र स्वच्छता आणि गृहविज्ञान, यांत्रिक तंत्रज्ञान, विद्युत तंत्रज्ञान, मराठी- अरेबिक हिंदी-उर्दू, बहुकौशल्य सहाय्यक तंत्रज्ञान या विषयांचा निकाल १०० टक्के लागला. ९० टक्के व त्यावरील गुण मिळवणारे १४७३ विद्यार्थी आहे. 

उत्तरपत्रिकांची छायाप्रत, गुणपडताळणी

गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रत पुनर्मूल्यांकनासाठी मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय आहे. त्याकरिता २८ मे ते ११ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येतील. श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना लगतच्या दोन संधी म्हणजे जुलै-ऑगस्ट २०२४ व मार्च २०२५ ची संधी मिळेल. पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी ३१ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेतले जातील.