करन्सी एक्सचेंजच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

रत्नागिरी:- करन्सी एक्सचेंजच्या बहाण्याने महिलेची दोघांनी मिळून सुमारे ४६ हजार ७०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिर नुरा व राहुल पांचाळ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. ही घटना सोमवारी २९ एप्रिल सायंकाळी पाच ते २५ मे २०२४ ला सायंकाळी सहा या कालावधीत कुवारबाव येथे घडली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलंक्रिती सुरेद्र कुमार श्रीवास्तव (२९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोन्ही संशयितांनी मिळून फिर्यादी महिलेला करन्सी एक्सचेंजसाठी २ हजार, १० हजार ३००, १५ हजार ३००, १९ हजार १०० रुपये असे वेळोवेळी एकूण ४६ हजार ७०० रुपये आपल्या बँक खात्यात भरण्यास सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अलंक्रिती श्रीवास्तव यांनी पैसे भरले परंतू संशयितांनी त्यांना कोणताही मोबदला न देता त्यांनी भरलेली रक्कमही परत न करता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा केला आहे.