आरजू कंपनीचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग

रत्नागिरी:- रत्नागिरी परिसरातील हजारो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मिरजोळे एमआयडीसीतील आरजू टेक्सोल कंपनीविरोधातला तपास आता येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. आपले पैसे लवकर परत मिळावे यासाठी आता गुंतवणूकदरांचे प्रयत्न सुरु असून पोलिसांकडून संबंधितांचे जबाब घेण्याचे काम सुरु झाले आहे.

साधारण वर्षभरापूर्वी सुरु झालेल्या आरजू टेक्सोल कंपनीने वेगवेगळ्या जिल्ह्यातील हजारो लोकांकडून दाम दुप्पट पैशांचा परतावा करतो असे सांगत कोट्यावधींची फसवणूक केली आणि ही कंपनी बंद पडली. याची कुजबुज गेले काही दिवस रत्नागिरी आणि परिसरात होती. दरम्यान शुक्रवारी राजेश पत्याणे यांनी आपली १८ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात केली आणि या फसवणुकीला वाचा फुटली. दरम्यान या कंपनीचे कार्यालय असलेली मिरजोळे एमआयडीसीतील जागा ही शकील मोडक नावाच्या व्यक्तीच्या मालकीची असल्याची माहिती पुढे आली असून ‘आपण कंपनीसोबत केलेला भाडेकरार रद्द केला आहे. या कंपनीशी कोणताही संबध राहिला नाही. त्यामुळे कंपनीचे संचालक, पदाधिकारी, कर्मचारी, गुंतवणूकदार तसेच ग्राहकांनी या इमारतीत प्रवेश करू नये व तसा प्रयत्न केल्यास संबधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल’ असा इशारा देखील देण्यात आलेला आहे. हे कार्यालय पोलिसांनी सील केले आहे.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आपल्या कारवाईस सुरुवात केली आहे. आरजू टेक्सोल कंपनीचे प्रसाद शशिकांत फडके रा. गावखडी, संजय विश्वनाथ सावंत, संजय गोविंद केळकर, अनि उर्फ अमर महादेव जाधव या संशयितांवर भा.दं.सं.क. 406, 420, 34 सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या गुन्हय़ा तपास पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. त्यासंदर्भात काही गुंतवणूकदारांना या शाखेकडे शनिवारी सायंकाळी उपस्थिती लावून आपल्याकडील कागदपत्रे पोलिसांकडे सादर केली आहेत. पोलीस यातील संबंधिताना बोलावून त्यांच्याकडून माहिती घेणार आहेत.