पर्यटकांनी रत्नागिरी गजबजली!

रत्नागिरी:- परीक्षा आणि निवडणुका संपल्यानंतर कोकणातील पर्यटनस्थळे गजबजू लागली आहेत. रत्नागिरीतील गणपतीपुळे, पावससह गुहागर समुद्रकिनाऱ्यासह तालुक्यातील अन्य पर्यटनस्थळावरही पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. तालुक्यात दररोज हजारो पर्यटक येत असल्याने येथील आर्थिक उलाढालही वाढली आहे.

यावर्षी निवडणुका आणि वाढत्या उकाड्यामुळे मुंबई, पुण्यातील नागरिकांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फिरायला जायचे नियोजन केले नव्हते. त्यामुळे परीक्षा लवकर संपूनही कोकणातील पर्यटनस्थळांवर शुकशुकाट होता. दोन दिवसांपूर्वी निवडणुकीचा शेवटचा टप्पा झाल्यानंतर आता कुटुंबासह मुंबई, पुण्यातील लोक पर्यटनासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत.

दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर याठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटकांनी हजेरी लावली आहे. पूर्वी गुहागरला धावती भेट देऊन जाणारा पर्यटक आता सलग तीन दिवस वास्तव्य करू लागला आहे. एवढेच नव्हे तर गुहागरात राहून आता गणपतीपुळे व दापोलीतील पर्यटनस्थळे पाहून पुन्हा गुहागरात येऊ लागला आहे. ही येथील पर्यटन सोयी सुविधांमुळे शक्य झाले आहे.

या सुट्टीमुळे गुहागर चौपाटी, समुद्रातील बोटीग, घोडेस्वार, उंट सफरी, खाद्य पदार्थांचे स्टॉलवर गर्दी गर्दी दिसत आहे. परचुरी खाडीमध्ये सत्यवान दर्देकर यांनी कोकणातील पहिलीच हाऊसबोट सुरू केली असून या सेवेला देखील पर्यटक पसंती देत आहेत. दाभोळ ‚ धोपावे फेरीबोट, तवसाळ‚ जयगड फेरीबोटीबरोबरच डॉ. चंद्रकांत मोकल व डॉ. योगेश मोकल यांनी याच परचुरी खाडीमध्ये फेरीबोट सेवा सुरू केली आहे.