जिल्ह्यातील धरण क्षेत्रात अनधिकृत प्रवेशास बंदी

जलाशय, तलाव, नदी, पाणी साठ्यांवर जाण्यास बंदी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील सर्व धरणे ही प्रतिबंधित क्षेत्रे करण्यात आली असून या ठिकाणी अनधिकृत प्रवेशास सक्त मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनी सुरक्षितता नियम पाळून खबरदारी बाळगावी व सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर यांनी केले आहे.

सर्व धरणांचे जलाशय, नदीपात्र या ठिकाणी पाण्याची खोली, साचलेला गाळ इत्यादीमुळे पाण्यात उतरल्यास दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे सर्वच जलाशय, तलाव, नदी, नदीतील पाणी साठे इ. ठिकाणी नागरिकांनी कोणत्याही कारणास्तव जाऊ नये. जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले पर्यटक व स्थानिकांचे इतर जिल्ह्यातून आलेले नातलग, आप्तेष्ट इ. ची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहेत. स्थानिक नदी पात्रालगतच्या स्थानिकांनाही पर्यटकांना बाहेरील नागरिकांना पर्यटन, करमणूक इ. कारणास्तव पाण्यात उतरण्यास मनाई करावी व संभाव्य दुर्घटनांबाबत सचेत करावे.

जिल्ह्यामध्ये वेगवेगल्या नदी नाल्यांवर एकूण ४६ ल. पा. प्रकल्प व ३ मध्यम प्रकल्प धरणे बांधण्यात आली आहेत. त्यामध्ये नियमितपणे पाणीसाठा करण्यात येत आहे. या धरणांव्यतिरिक्त मृद व जलसंधारण खात्यामार्फत देखील अनेक स्थानिक नाल्यांवर लहान-लहान धरणे बांधण्यात येऊन, त्यामध्ये पाणीसाठा करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, काजळी, कोदवली, मुचकुंदी व बावनदी इ. सारख्या प्रमुख नद्या असून, ह्या नद्यांना पावसाळी हंगामात पूर येतो तर इतर कालावधीत देखील वरच्या भागातील धरणांमुळे अथवा झऱ्यांमुळे त्या प्रवाहीत राहतात. प्रवाहामध्ये असल्याने नदीपात्रातच स्थानिक पाणीसाठे तयार होतात.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील धरणांमध्ये साधारणतः 40 ते 45 टक्के इतका पाणीसाठा आहे. तथापि, ज्या ज्या धरणांमध्ये पाणीसाठा आहे, त्या सर्वच ठिकाणी पाणीसाठा कमी झाला असला तरीही पाण्याची खोली 3 ते 4 मी. पेक्षा अद्याप जास्त आहे. तळालगतचा हा जलसाठा असल्याने या मध्ये गाळ चिखलाचे देखील काही प्रमाण आहे. नद्यांमधील डोह किंवा स्थानिक कोंडी मध्ये देखील अशीच परिस्थिती असून सदर डोह खोल असून, गाळाने भरलेले असण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात व लगतच्या जिल्ह्यांमध्ये धरणाच्या जलाशयात अथवा नदीपात्रात पोहणे, जलक्रीडा, पर्यटन, करमणूक इ. सारख्या कारणास्तव नागरिकांनी, लहान मुलांनी अनावधानाने गेल्याने दुर्घटना घडल्या आहेत. त्याकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व धरणे ही प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. त्याठिकाणी अनधिकृत प्रवेशास सक्त मनाई आहे. सर्व धरणांचे जलाशय, नदीपात्र या ठिकाणी देखील वरील नमूद कारणे जसे की, पाण्याची खोली, साचलेला गाळ इ. मुळे, पाण्यात उतरल्यास दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे सर्वच जलाशय, तलाव, नदी, नदीतील पाणीसाठे इ. ठिकाणी नागरिकांनी कोणत्याही कारणास्तव जाऊ नये . त्यांनी पर्यटकांना बाहेरील नागरिकांना पर्यटन, करमणूक इ. कारणास्तव पाण्यात उतरण्यास मनाई करावी व संभाव्य दुर्घटनांबाबत सचेत करावे. नदीपात्रात, काठावर अथवा जलाशयात ज्या शेतक-यांचे पंपमोटर इ. साधने आहेत ती त्यांनी आताच काढून घ्यावीत, अन्यथा पावसाळी हंगामात पूरसमयी ही कामे धोकादायक ठरू शकतात. नागरिकांनी सुरक्षितता नियम पाळून खबरदारी बाळगावी व सतर्क राहावे. आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.