आयपीएलच्या लाईव्ह सामन्यांचा थरार रत्नागिरीत अनुभवता येणार

२७, २८ एप्रिल रोजी प्रमोद महाजन क्रिडा संकुल येथे आयोजन

रत्नागिरी:- दरवर्षीप्रमाणे यंदाही टाटा आयपीएल ‘फॅन पार्क’ चे 27 आणि 28 एप्रिल रोजी प्रमोद महाजन क्रिडा संकुल येथे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर,सोलापूर,नागपूर आणि आता रत्नागिरीमध्ये या आयपीएलच्या चार सामन्यांचे थेट प्रक्षेपण ‘फॅन पार्क’ व्दारे रत्नागिरीकरांना 18 बाय 32 च्या एलईडी स्क्रिनवर अनुभवता येणार असल्याची माहिती बीसीसीआयचे पदाधिकारी अमित सिध्देश्वर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव बिपिन बंदरकर,किशोर भुते,दिपक देसाई,सईद मुकादम,सुरेश जैन,दिपक पवार उपस्थित होते.

स्टेडियम मध्ये मॅच पाहण्यासाठी नागरिकांना तिकिटासाठी खर्च करावा लागतो. परंतू फॅन पार्क मध्ये सर्व नागरिकांना निशुल्क प्रवेश दिला जातो. याठिकाणीही स्टेडियमप्रमाणेच वातावरण निर्मिती केली जाते. त्यामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण मॅचचा आनंद घेउ शकतात. फॅन पार्कमध्ये लहान मुलांसाठी फनी गेम्स, फूड स्टॉल,व्हीआयपी लॉन्जही असणार आहे. तसेच यावेळी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले असून येणार्‍या नारिकांना कूपन दिले जाणार आहे. या कुपनचा एक भाग लकी ड्रॉच्या बॉक्समध्ये टाकला जाईल. ईनिंग ब्रेकमध्ये लकी ड्रॉ विजेत्याला आयपीएल खेळाडुंच्या सहिची जर्सी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे यंदा पहिल्या मॅचवेळी फॅन पार्कमध्ये आपल्या टिमला सपोर्ट करण्यासाठी आलेल्या समर्थकांचा एका छोटा व्हिडिओ तयार करुन तो जगात सर्वत्र दाखवला जाणार आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांनी या आयपीएल ‘फॅन पार्क’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन अमित सिध्देश्वर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.