जिल्ह्यातील ३९१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

रत्नागिरी पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर

रत्नागिरी:- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने १६ मार्चपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यातील गुंड प्रवृत्तीच्या ३९१ व्यक्तींवर आतापर्यंत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून बंधपत्र करून घेतली आहेत, तर १५९ जणांना वॉरंट बजावण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी जिल्ह्याचे पोलिस दल पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत ३९१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

चेकनाक्यांवरही सीसीटीव्हीची करडी नजर
रत्नागिरी जिल्ह्यात येण्यासाठी असलेल्या अणुस्कुरा, कुंभार्ली, मुर्शी, म्हाप्रळ, लाटवण या पाच प्रमुख ठिकाणी असलेल्या चेकनाक्यांवर २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर आहे. प्रत्येक ठिकाणी एक पोलिस अधिकारी व ४ कर्मचारी तैनात आहेत.

जिल्ह्यातील १५९ जणांना नोटिसा
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यातील ३९१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून बंधपत्र करून घेण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील १५९ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

-जयश्री गायकवाड, अप्पर पोलिस अधीक्षक, रत्नागिरी