शिक्षक बदल्यांमधील भ्रष्टाचाराला बसणार आळा

बिंदुनामावली पोर्टलवर अपलोड झाल्यावरच होणार शिक्षकांच्या बदल्या

रत्नागिरी:- राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या बिंदुनामावली पोर्टलवर अपलोड झाल्यावरच शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे बदल्यांमधील भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. राज्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या सर्व जिल्हा परिषदांच्या बिंदुनामावल्या अद्ययावत होऊन बदली पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर होणार असल्याची माहिती ग्रामविकास विभागाने दिली आहे.

प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसह जिल्हांतर्गत बदल्याही ऑनलाईन होणार आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांत होणारा मोठा भ्रष्टाचार थांबणार असल्याचे मत जिल्ह्यातील शिक्षक व्यक्त करत आहेत. आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या या नवीन शिक्षक भरतीसाठी थांबविल्या आहेत. भरती प्रक्रिया झाल्यानंतर शिक्षकांच्या बदल्या पूर्वीप्रमाणे होणार आहेत.

आंतरजिल्हा बदल्या या सर्व जिल्हा परिषदांच्या बिंदुनामावली अद्ययावत होऊन बदली पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर होणार आहेत. आंतरजिल्हा बदलीसाठी पोर्टलवर अर्ज केलेल्या शिक्षकांना अर्जात बदल करण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. यामुळे अंतिम बिंदुनामावलीनुसार जिल्हा परिषदांकडील वाढलेल्या रिक्त पदावर राज्यातील बदली इच्छुक शिक्षकांना बदलीने जाता येणार आहे.